मनपाने प्रस्ताव फेटाळला : मनुष्यबळ व निधी नसल्याने देखभालीस असमर्थ
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मेट्रो ट्रॅकच्या पिलरवर महामेट्रोने साकारलेल्या व्हर्टिकल गार्डनची देखभाल करण्याचा प्रस्ताव महापालिकेने फेटाळला आहे. मनुष्यबळ व निधी अभावी देखभाल शक्य नसल्याचे मनपाने कळविले आहे.
महामेट्रोने दोन आठवड्यापूवी महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांना पत्र पाठवून व्हर्टिकल गार्डनच्या देखभालीची जबाबदारी घ्यावी, अशी विनंती केली होती. परंतु याला मनपाने नकार दिला आहे.
महामेट्रोतर्फे सीताबर्डी ते मिहान आणि सीताबर्डी ते हिंगणा मार्गावर मेट्रो चालवण्यात येते. या दोन्ही मार्गांवर लाखो रुपये खर्चून मेट्रोने व्हर्टिकल गार्डन विकसित केले आहेत. या गार्डनच्या देखभालीसाठी पुढील चार ते पाच वर्षे मेट्रोला दरवर्षी पाच लाख रुपये खर्च करावे लागणार आहे. गार्डनसाठी ड्रीप इरिगेशन आणि विद्युत शुल्कावर खर्च करावा लागणार आहे. मनपा हर्टिकल गार्डनची जबाबदारी घेण्यास तयार नसेल तर मेट्रोला त्यांच्या पिलर व इतर ठिकाणी लहान जाहिराती लावण्याची परवानगी द्यावी, यातून येणाऱ्या उत्पन्नातून व्हर्टिकल गार्डनची देखभाल करता येईल, असे महामेट्रोने पत्रात म्हटले आहे. महापालिकेने याला नकार दिला आहे.
मनपाच्या उद्यान विभागात आधीच मनुष्यबळ नाही. निधीचीही कमतरता आहे. अशा परिस्थितीत व्हर्टिकल गार्डनची देखभाल शक्य नसल्याने हा प्रस्ताव नाकारल्याला उद्यान विभागाचे उपायुक्त अमोल चोरपगार यांनी दुजोरा दिला.
...
सीएसआर निधीतून खर्च करण्याचा सल्ला
व्हर्टिकल गार्डन, पिलर यांच्या देखभालीसाठी शहरातील विविध कॉपोर्रेट समूहांकडून सीएसआर निधीच्या माध्यमातून मेट्रोने निधी मिळवण्याचा प्रयत्न करावा, असा सल्ला मनपाच्या जाहिरात विभागाने दिला आहे. मेट्रो मागार्साठी उभारण्यात आलेल्या पिलर व मध्य भागाची मालकी महापालिकेकडे आहे. मनपाकडे निधीचा अभाव असल्याने या देखभालीची जबाबदारी खासगी संस्थेला सोपवण्यात आली आहे.