नागपूर : मेयो हॉस्पिटल चौकात मेट्रो रेल्वेसाठी पिलर (खांब) उभारणीचे काम सुरू असून, त्यामुळे वेळोवेळी ‘ट्रॅफिक जाम’ होत नागरिकांना असुविधांचा सामना करावा लागत आहे. मेयोमध्ये येणाऱ्या रुग्णांना गीतांजली थिएटरमागून अरुंद रस्त्यावरून किंवा रामझुल्याला वळसा घालून यावे लागते. सुलभ वाहतुकीसाठी या ठिकाणी वाहतूक पोलीस आणि कंपनीने आपली माणसे दररोज नेमावीत, अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी लोकमतशी बोलताना केली. बांधकाम सुरू असलेल्या परिसराच्या सभोवताल टिनाने कुंपण टाकले आहे. त्यामुळे मुख्य रस्त्याचा बराच भाग कुंपणाने व्यापला आहे. या रस्त्यावरून वर्दळ जास्त असल्यामुळे बहुतांश वेळी वाहतूक खोळंबते. सकाळी नोकरीवर जाणाऱ्यांना गर्दीतून महत्प्रयत्नाने मार्ग काढावा लागतो. त्यामुळे कार्यालयात वेळेवर पोहोचण्यासाठी नोकरदारांचा या रस्त्यावरून वेळेपूर्वीच जाण्याचा प्रयत्न असतो. वेळोवेळी ‘ट्रॅफिक जाम’ होत असल्यामुळे वाहतूक पोलीस याकडे कानाडोळा करतात. या ठिकाणी सक्षम वाहतूक पोलिसांची नियुक्ती केल्यास वाहतुकीचा खोळंबा होणार नाही, असे नागरिकांचे मत आहे. मेयो हॉस्पिटल चौकापासून संत्रामार्केटकडे वळणाऱ्या मेट्रो रेल्वेच्या मार्गावर आठ पिलर उभारण्यात येणार आहेत. या कामासाठी साधारणत: तीन ते चार महिन्यांचा कालावधी लागणार आहे. सध्या तर पहिल्या पिलरचे काम सुरू आहे. पुढे वाहतुकीची परिस्थिती अतिशय गंभीर होणार आहे. या मार्गावरील वाहतूक इतरत्र वळविण्याची नागरिकांची मागणी आहे. प्रसंगी आंदोलन करण्याची तयारी नागरिकांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.(प्रतिनिधी)
मेट्रोच्या कामाचा वाहतुकीला फटका
By admin | Published: June 22, 2016 2:59 AM