नितीन गडकरी यांची ग्वाही : भाजपच्या महिला आघाडीची घोषणा नागपूर : उपराजधानीचा कायापालट करण्याची क्षमता असलेल्या नऊ हजार कोटींच्या नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे काम जोरात सुरू आहे. पुढील वर्षात होत असलेली महापालिके ची निवडणूक प्रतिष्ठेची आहे. त्यापूर्वी मेट्रो रेल्वेचा पहिला टप्पा पूर्ण करून डिसेंबर २०१६ पूर्वी नागपूर शहरात मेट्रो धावायला लागेल, अशी ग्वाही केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी दिली. रेशीमबाग येथील स्मृती मंदिर सभागृहात आयोजित भाजप महिला आघाडीच्या पदग्रहण समारंभात गडकरी बोलत होते. शहर अध्यक्ष आमदार सुधाकर कोहळे अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर आमदार कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, डॉ. मिलिंद माने, माजी महापौर अर्चना डेहनकर, कल्पना पांडे, माया इवनाते, महामंत्री संदीप जोशी, संदीप जाधव, माया ठवरे, भाजपच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष नंदा जिचकार, राज्य महिला आयोगाच्या सदस्य नीता ठाकरे, किशोर पालांदूरकर, भोजराज डुम्बे आदी उपस्थित होते. देशभरात नागपूर शहरातील मेट्रो प्रकल्पाचे काम सर्वाधिक वेगाने सुरू आहे. केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता असून महापालिकेतही भाजपला स्पष्ट बहुमत मिळणार असल्याने शहर विकासाची बुलेट ट्रेन सुपरफास्ट धावणार आहे. नागपूर शहरात २२ हजार कोटींची विकास कामे हाती घेण्यात आलेली आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून गरिबांसाठी शहरात ५०हजार घरे उभारली जात आहेत. अंबाझरी व तेलंगखेडी तलाव पर्यटन स्थळ म्हणून विकसित केले जात आहे. शहरातील ड्रेनेज लाईन नादुुरुस्त झालेल्या आहेत. रस्त्यांच्या बाजूला असलेल्या नाल्या स्वच्छ होत नसल्याने पावसाचे पाणी साचल्याने रस्ते नादुरुस्त होतात. नाल्या पावसाळ्यापूर्वी स्वच्छ झाल्या पाहिजे. २४ बाय ७ ही योजना राबविणारी नागपूर महापालिका एकमेव आहे. तसेच दूषित पाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करणारेही पहिले शहर आहे. यामुळे महापालिकेला वर्षाला १६ कोटी मिळणार आहे. तसेच दूषित पाण्यावर प्रकिया करताना यापासून निर्माण होणाऱ्या बायोसिएनजीवर शहरात लवकरच ७० ग्रीन बसेस धावणार असल्याची माहिती त्यांनी दिली. (प्रतिनिधी) भांडेवाडीतील कचऱ्याचा रिंगरोडसाठी वापर भांडेवाडी येथे शहरातील कचरा साठविला जातो. या कचऱ्यावर प्रक्रिया करून तो रिंंगरोडसाठी वापरला जाणार आहे. त्यामुळे भांडेवाडी येथील जागा रिकामी होणार असल्याने प्रस्तावित डम्पिंग यार्डसाठी शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहित करण्याची गरज भासणार नाही, अशी माहिती गडकरी यांनी दिली. असे झाले तर कळमेश्वर तालुक्यातील बोरगाव, बेल्लोरी, सिल्लोरी व कोंडाखैरी आदी गावातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. नागपूर एक मॉडेल पक्षाच्या जाहीरनाम्यात ज्या घोषणा करण्यात आल्या होत्या त्यानुसार शहरातील विकास कामे होत आहे. ७५० कोटींची २४ बाय ७ पाणीपुरवठा योजना, पाणीपुरवठ्याचे आॅडिट, अनाधिकृत ले-आऊ ट भागातही कामांना मंजुरी देण्यात आली आहे. शहराचा चौफेर विकास होत असून नागपूर शहर हे देशापुढे एक विकसित शहराचे मॉडेल म्हणून उभे राहात असल्याचे गडकरी म्हणाले. भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल महापालिका निवडणुकीत पक्ष कार्यकर्त्यांनाच संधी दिली जाईल. पक्षाचा सच्चा कार्यकर्ता असेल त्याचाच विचार होईल. सर्वसामान्यांना न्याय देणारा भाजप हा एकमेव पक्ष आहे. विधानसभा व लोकसभा निवडणुकीत शहरातून काँग्रेस मुक्त झाली. आता महापालिका निवडणुकीतही शहर काँग्रेसमुक्त होईल. भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल असा विश्वास सुधाकर कोहळे यांनी व्यक्त केला. कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, डॉ. मिलिंद माने, अर्चना डेहनकर, माया इवनाते आदींनीही महापालिका निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. लता येरखेडे यांनी प्रस्ताविक केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. महिला आघाडीची जम्बो कार्यकारिणी महिला आघाडीच्या अध्यक्ष नंदा जिचकार यांनी भाजपच्या शहर महिला आघाडीच्या नवीन कार्यकारिणीची घोषणा केली. या जेम्बो कार्यकारिणीत महामंत्री चार असून यात सीमा ढोमणे, लता येरखेडे, माया ठवरे व संध्या ठाकरे, संपर्कप्रमुख मंगला मस्के व कल्याणी तेलंग यांच्यासह उपाध्यक्ष १५, मंत्री २८ तर २१ सदस्यांचा समावेश असलेल्या ९२ सदस्यांची जम्बो कार्यकारिणी जाहीर केली.
मनपा निवडणुकीपूर्वी मेट्रो धावणार
By admin | Published: August 07, 2016 2:09 AM