लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महामेट्रोच्या नागपूर प्रकल्पांतर्गत हिंगणा मार्ग रिच-३ मध्ये लोकमान्यनगर ते सुभाषनगर या ५.५ कि़मी.च्या मेट्रो मार्गावर महामेट्रोतर्फे मेट्रोची ट्रायल रन गुरुवारी घेण्यात आली. अनेक चाचण्यानंतर या मार्गावर दोन महिन्यातच व्यावसायिक रन सुरू होणार असल्याची माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांनी ट्रायल रननंतर पत्रकारांशी बोलताना दिली. १०.८ कि़मी. मार्गावर १० स्टेशनदीक्षित म्हणाले, सीताबर्डी ते हिंगणा मार्ग शहरी आणि ग्रामीण भागाला जोडणारा आहे. एकूण १०.८ कि़मी.च्या मेट्रोमुळे या भागातील वाहतूक व्यवस्था सुलभ होणार आहे. या मार्गावर लोकमान्यनगर, सुभाषनगर, बन्सीनगर, वासुदेवनगर, रचना (रिंग रोड), धरमपेठ कॉलेज, एलएडी चौक, शंकरनगर चौक, इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग असे दहा स्टेशन आहेत. या मार्गावर सीताबर्डी ते हिंगणा आणि दत्तवाडीपर्यंत मेट्रो धावणार आहे. या मार्गावर ४०० स्पॅन टाकण्यात आले आहेत. एक स्पॅन ३५ ते ३६ मीटरचा असून त्याकरिता जवळपास ४ हजार सेगमेंट टाकण्यात आले आहेत. कास्टिंग हिंगणा येथे करण्यात आले. वर्धा रोडवर २८ मीटरचे स्पॅन आहेत.अॅक्वा थीमवर स्टेशनसुभाषनगरलगत अंबाझरी तलाव असल्यामुळे या स्टेशनची उभारणी अॅक्वा थीमवर करण्यात आली आहे. त्यामुळे हे स्टेशन पर्यटनप्रेमींसाठी आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. स्टेशनवर संवाद साधण्यासाठी सर्र्वोत्तम उपकरणे बसविली आहेत. त्याची रेल्वेशी जोडणी आहे. त्यामुळे प्रवाशांना तात्काळ मदत मिळेल. पार्किंगमधील सीसीटीव्ही कॅमेरे १५० मीटरचा टप्पा कव्हर करतील. दोन्ही स्टेशनवर बेबी केअर रूम, एस्कॅलेटर, एलिव्हेटर, लिफ्ट आदी सुविधा आहेत. सुभाषनगर स्टेशनला जोडणारा ७३० मीटर लांबीचा एलिव्हेटेड वॉक वे धरमपेठ कॉलेज स्टेशनपर्यंत राहील. त्यामुळे पर्यटकांना अंबाझरी स्टेशनचे दृश्य न्याहाळता येईल. तसेच बैठक व्यवस्था आणि रेस्टॉरंटमुळे लोकांचा ताण दूर होईल.रस्त्याचे रुंदीकरणहिंगणा मार्ग अरुंद असल्यामुळे बांधकाम करताना अडचणी यायच्या. पण प्रारंभी महामेट्रोने रस्त्याचे ३-३ मीटर रुंदीकरण करून वाहतुकीसाठी मोठा केला. त्यामुळे बॅरिकेट्स लावून वाहतूक सुरळीत करून बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे.मेट्रो प्रकल्पांतर्गत ९९ टक्के जमिनीचे अधिग्रहण झाले असून ८० टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे. व्यावसायिक रनपासून १८ लाखांचे उत्पन्न मिळाल्याचे दीक्षित यांनी सांगितले.पत्रपरिषदेत महामेट्रोचे प्रकल्प संचालक महेशकुमार, वित्त संचालक एस. शिवमाथन आणि महाव्यवस्थापक (प्रशासन) अनिल कोकाटे उपस्थित होते.मुख्य रेल्वे स्थानकापुढील उड्डाणपूल पाडणारआचारसंहितेमुळे काही दिवस अनेक विकास कामे बंद होती. पण आता सुरू झाली आहेत. मुख्य रेल्वे स्थानकापुढील उड्डाणपूल पाडण्यात येणार आहे. पण त्यापूर्वी पुलाखालील दुकानदारांना एमएसआरडीसी आणि मॉडर्न स्कूलच्या जमिनीवर बांधण्यात येणाऱ्या संकुलात स्थलांतरित करण्यात येणार आहे. जयस्तंभ व मानस चौक आणि लोखंडी पुलाजवळील बांधकाम सुरू झाले आहे. ही कामे बांधकाम विभाग आणि मनपाअंतर्गत महामेट्रो करीत आहे.गड्डीगोदाम डबलडेकर पुलाचा तिढा सुटणारसीताबर्डी इंटरचेंज ते ऑटोमोबाईल चौकापर्यंत महामेट्रोच्या मार्गावर गड्डीगोदाम, गुरुद्वाराजवळील डबलडेकर पुलाला रेल्वेकडून मंजुरी मिळाली, पण एनएचएआयकडून अजूनही मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे डबलडेकर पुलाचे बांधकाम सध्या बंद आहे. लवकरच मंजुरी मिळण्याची अपेक्षा आहे.अंबाझरी तलावाचा प्रश्न निकालीअंबाझरी तलाव मनपांतर्गत येतो. तांत्रिक सिंचनासंदर्भातील प्रश्न सिंचन विभाग सांभाळते. विभागाने काही त्रुटी सांगितल्या आहेत. त्या महामेट्रोने पूर्वीच पूर्ण केल्या आहेत. याशिवाय नाशिक येथील बांध सुरक्षा कार्यालयाने सांगितलेल्या उपाययोजनांची पूर्तता केली आहे. सिंचन विभागाने पैशाची जी मागणी करेल, त्याची पूर्तता करणार आहे.