लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महामेट्रोच्या वतीने संचालित नागपूर मेट्रो रेल्वे सेवेच्या वतीने शहरातील प्रत्येक भागाला जोडण्यासाठी आवश्यक पावले उचलण्यात येत आहेत. त्यानुसार बुधवारी मेट्रो फिडर कॅब सर्व्हिस ऑन कॉलची सुरुवात करण्यात आली आहे.
मेट्रो भवन परिसरात महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक बृजेश दीक्षित यांनी हिरवी झेंडी दाखवून मेट्रो फिडर कॅब सर्व्हिसेस ऑन कॉलचा शुभारंभ केला. यावेळी महामेट्रोचे कार्यकारी संचालक अनिल कोकाटे उपस्थित होते. महामेट्रोच्या वतीने यापूर्वी एअरपोर्ट ते एअरपोर्ट मेट्रो स्टेशन दरम्यान फिडर सर्व्हिस सुरू करण्यात आली. विविध भागांना मेट्रो स्टेशनशी जोडण्यासाठी फिडर बस सर्व्हिस देण्यात येत आहे. त्यास नागरिकांचा चांगला प्रतिसादही लाभत आहे. आता मेट्रो फिडर कॅब सर्व्हिस ऑन कॉलची सुरुवात करण्यात आली आहे. यामुळे खापरी मेट्रो स्टेशनपासून मिहानच्या अनेक कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना या सेवेचा लाभ मिळणार आहे. या सेवेचा लाभ मिहान आणि आजूबाजूच्या कर्मचारी तसेच नागरिकांना होणार आहे. यात मासिक पास यात्रा आणि मासिक सदस्यता असे पर्यायही देण्यात आले आहे. या सेवेनुसार मेट्रो फिडर कॅब सेवा देणारी चमू खापरी मेट्रो स्टेशनवर उपलब्ध राहणार आहे. ही सेवा मिहान, आयटी कार्पोरेट, एम्स, आयआयएम, कॉनकोर आणि आजूबाजूच्या नागरिकांसाठी उपयुक्त ठरणार आहे.
............