नागपूर : महा मेट्रोने प्रदूषणमुक्त आणि वाहतुकीला सुलभ ई-स्कुटर यंत्रणा प्रवाशांसाठी मेट्रो स्टेशनवर उपलब्ध करून दिली आहे. या ई-स्कुटर यंत्रणेत दिवसेंदिवस वाढ होत असून एअरपोर्ट साऊथ, एअरपोर्ट, जेपीनगर व रहाटे कॉलनी मेट्रो स्टेशन येथे एकूण ३० ई-बाईक व ई-स्कुटर २९ ऑक्टोबरपासून उपलब्ध झाल्या आहेत.
महा मेट्रोने केएचएस असोसिएट्स नागपूर या कंपनीसोबत सामंजस्य करार केला असून कंपनीच्या स्विच नावाच्या ई-फिडर सेवा नागरिकांसाठी उपलब्ध आहेत. लो स्पीड टु व्हीलर, ई-रिक्षा, ई-सायकल व चार्जिग स्टेशनचा यात समावेश आहे. प्रवाशांसाठी एअरपोर्ट मेट्रो स्टेशन ते एअरपोर्ट येथे जाणाऱ्या प्रवाशांसाठी नि:शुल्क सेवा देण्याची योजना असून नागरिक या सेवेचा उपयोग करीत आहेत. सकाळी ६ ते १० आणि सायंकाळी ५ ते १० वाजेपर्यंत ही सेवा उपलब्ध आहे. इतर वेळेत १० रुपये प्रती व्यक्ती भाडे आकारण्यात येत आहे. या व्यतिरिक्त खापरी मेट्रो स्टेशन येथून बुटीबोरी व लोकमान्य नगर मेट्रो स्टेशन येथून हिंगणा व आजूबाजूच्या परिसरात जाण्यासाठी फिडर सर्व्हिसच्या रुपात आपली बस सेवा सुरु करण्यात आली आहे. तसेच मेट्रो प्रवासात आता आपली किंवा फिडर सर्व्हिस येथील उपलब्ध सायकल देखील एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणापर्यंत नेता येणार आहे. मल्टी मॉडेल इंटिग्रेशन अंतर्गत फस्ट टु लास्ट माईल कनेक्टिव्हिटी नॉन मोटराईज ट्रान्सपोर्ट अशी संकल्पना असून याद्वारे प्रत्येक प्रवाशाला स्टेशनवरून वाहतुकीची सुलभ यंत्रणा उपलब्ध होत आहे. नागरिकांनी आपल्या वाहनांचा वापर न करता मेट्रो सेवेचा उपयोग करावा हा यामागील उद्देश आहे. यामुळे इंधनाची बचत होऊन प्रदूषणही कमी होणार आहे.