लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - वडिलोपार्जित संपत्तीत हिस्सा मागण्यासाठी पत्नीला समोर करीत असल्याचा संशय आल्याने मेव्हण्याने त्याच्या जावयावर हल्ला करून त्यांना जबर जखमी केले. मुन्शी रामगुलाम दुबे (वय ४७) असे जखमीचे नाव आहे.
ते खरबी मार्गावरील लक्ष्मीनारायण कॉलनीत राहतात. त्यांच्या पत्नीचा तिच्या भावासोबत वडिलोपार्जित मालमत्तेच्या हिस्सेवाटणीवरून वाद सुरू आहे. जावई दुबेच तिला समोर करून हिस्सा मागत असल्याची दुबेंच्या मेव्हण्यांची भावना झाली आहे. या पार्श्वभूमीवर, माहेरी असलेल्या पत्नीला घेण्यासाठी दुबे सोमवारी सायंकाळी ६.३० ला वसंतनगर बाभुळखेडा भागातील सासूरवाडीत आले. तेथे त्यांचे मेव्हणे मनोज सीताराम मिश्रा (वय ४५) आणि त्याची पत्नी सुनीता (वय ४२) या दोघांनी वाद घातला. त्यानंतर मनोजने लोखंडी रॉडने मारून दुबे यांच्या हाताला जबर दुखापत केली. अन्य नातेवाईक धावल्याने वाद सुटला. जखमी दुबेंनी दिलेल्या तक्रारीवरून अजनी पोलिसांनी आरोपी मनोज आणि सुनीता मिश्राविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.
---