नागपूर : म्हाडाच्या नोकर भरतीसाठी रविवारी राज्यभरात होणारी परीक्षा ऐनवेळी रद्द करण्यात आली. देशभरातील विद्यार्थी परीक्षेसाठी रविवारी सकाळी केंद्रावर पोहचल्यानंतर परीक्षा रद्द झाल्याचे कळाल्याने त्यांना चांगलाच मनस्ताप झाला.
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना म्हाडाच्या नोकर भरतीसाठी होणाऱ्या परीक्षेबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्या तक्रारीच्या अनुषंगाने आव्हाड यांनी शनिवारी मध्यरात्रीच परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. त्यांनी परीक्षा रद्द करण्यासंदर्भातील एक व्हिडिओ रात्री सोशल मीडियावर शेअर केला होता. म्हाडाच्या तांत्रिक व अतांत्रिक गटातील १४ संवर्गातील ५६५ पदे भरण्याकरिता या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. यात स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, भूमापक, अनुरेखक, कार्यकारी अभियंता, उपअभियंता, सहायक अभियंता, कनिष्ठ अभियंता या तांत्रिक पदाचा समावेश होता.
देशभरातील उमेदवारांनी त्यासाठी ऑनलाईन अर्ज करून आठवडाभरापूर्वी हॉल तिकीट मिळविले होते. नागपुरातही या परीक्षेचे काही केंद्र होते. मध्यप्रदेश, छत्तीसगड दिल्लीसह राज्यातील गडचिरोलीपासून मुंबईपर्यंतचे उमेदवार परीक्षेसाठी नागपुरात पोहचले होते. बाहेरगावाहून येणारे उमेदवार शनिवारी मध्यरात्रीच नागपुरात पोहचले. कुणी हॉटेलात कुणी नातेवाईक व मित्रांकडे रात्र काढली आणि सकाळी परीक्षेला जाण्याची तयारी करीत असताना सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना परीक्षा रद्द झाल्याचे कळले. तरीही खात्रीसाठी विद्यार्थी केंद्रावर पोहचले. तर केंद्रावर सर्व शुकशुकाट होता. संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी म्हाडाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करून आपल्या व्यथा ऐकविल्या.
म्हाडाच्या परीक्षा पुढे ढकलल्या?
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातील तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील सरळसेवा भरती प्रक्रियेनुसार १२ ते १५ डिसेंबर व १९ व २० डिसेंबर रोजी घेण्यात येणाऱ्या परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे परीक्षार्थ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
मी मध्यप्रदेशातील बालाघाटहून आलो आहे. एका खासगी कंपनीत नोकरी करतो. सुट्या मिळत नसल्याने शनिवारी सायंकाळपर्यंत ड्युटी केली. सायंकाळची रेल्वे पकडली. रात्री १२ वाजता नागपुरात पोहचलो. मित्राकडे रात्र घालविली. सकाळी परीक्षेला जात असताना यू-ट्यूबवर मंत्र्यांचा परीक्षा रद्द झाल्याचा व्हिडिओ बघितला. तरीही खात्री करण्यासाठी सेंटरवर पोहचलो. परीक्षा रद्द झाल्याने चीड निर्माण झाली. आमचे शारीरिक, मानसिक, आर्थिक नुकसान झाले आहे.
आशिष पंधरे, परीक्षार्थी
आतापर्यंत चौथ्यांदा सरकारने आयोजित केलेल्या परीक्षा ऐनवेळी रद्द करण्यात आल्या आहेत. वारंवार सरकारच्या मंत्र्यांना परीक्षा रद्द करण्याची वेळच का येते? खरे तर सरकार विद्यार्थ्यांच्या, युवकांच्या प्रश्नांना गंभीरतेनेच घेत नाही. मंत्र्यांना वाटते परीक्षेत भ्रष्टाचार झाला आहे आणि ते दलालांना विद्यार्थ्यांचे पैसे परत करा अशी विनंती करतात. दलालांवर कारवाई का करीत नाही? ऐनवेळी परीक्षा रद्द केल्याने विद्यार्थ्यांना होणारा त्रास लक्षात घेता मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, विभागाच्या सचिवांना निलंबित करावे. खरे तर आता विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन दबावगट निर्माण करणे गरजेचे आहे.
उमेश कोराम, स्टुडंट्स राइट्स असोसिएशन ऑफ इंडिया