नागपूर : अभियांत्रिकी, फार्मसी, कृषी व पशू व मत्सविज्ञान अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी पूर्वपरीक्षा एमएचटी-सीईटीचे निकाल गुरुवारी जाहीर झाले. इंजिनिअरिंग व कृषी अभ्यासक्रमासाठीच्या (पीसीएम ग्रुप) सीईटीमध्ये नागपूरचा सचिन काळे व अकोल्याचा शरयू देशमुख हे १०० टक्के प्राप्त करीत राज्यात अव्वल ठरले आहेत. दुसरीकडे फार्मसी व मत्सविज्ञान अभ्यासक्रमाच्या सीईटीमध्ये १०० टक्के गुण प्राप्त करणारी नागपूरची अदिती टेंभुर्णीकर व अमरावतीचा नीरज काकरानिया हे राज्यात अव्वल ठरले आहेत.
यावेळी एमएचटी-सीईटीच्या इंजिनिअरिंग व कृषी अभ्यासक्रमात १३ विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण प्राप्त झाले आहेत, तर फार्मसी व मत्सविज्ञान विभागात १४ विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण प्राप्त केले आहेत. यामध्ये नागपूरचे सचिन व आदिती, तर अकाेल्याचा शरयू व अमरावतीच्या नीरजचा समावेश आहे. पीसीएम ग्रुपमध्ये ९९.९९ टक्के गुणांसह दुसऱ्या स्थानावर अकाेल्याचा वेदांत तायडे आहे. बुलढाण्याचा प्रसन्ना नागे हा ९९.९७ टक्के गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. अमरावतीचा वेदांत पारखे (९९.९६ टक्के) चाैथ्या स्थानावर व आस्था चव्हाण (९९.९५ टक्के) गुणांसह पाचव्या स्थानावर आहे.
पीसीबी ग्रुपमध्ये अकाेल्याचा साकर बांडे दुसरा, भाग्यश्री बिलगिले तिसऱ्या क्रमांकावर आहे. नागपूरच्या प्राजक्ता लिहितकरने चाैथा क्रमांक प्राप्त केला आहे. अमरावतीचा राजरतन दहिवडे हा पाचव्या स्थानी आहे. नागपूरची साक्षी मेश्राम व खुशी रणदिवे या पाचव्या व सहाव्या क्रमांकावर आहेत. यावर्षी पहिल्यांदाच पीसीएम आणि पीसीबी या दाेन्ही ग्रुपमध्ये विदर्भाच्या मुलांनी माेठ्या संख्येने राज्यात क्रमांक मिळविला आहे. यावर्षी एमएचटी-सीईटीच्या निकालात पश्चिम महाराष्ट्र व उर्वरित महाराष्ट्राच्या तुलनेत विदर्भाचा दबदबा निर्माण झाला आहे.
नागपूर विभागातून ५६ परीक्षार्थी
सीईटी सेलकडून ऑगस्ट महिन्यात सीईटी परीक्षा घेण्यात आली. यामध्ये नागपूर विभागातून ५६ हजार ४३५ विद्यार्थी परीक्षेला बसले हाेते. यात २६,८१४ विद्यार्थी फार्मसी व मत्सविज्ञान अभ्यासक्रमासाठी (पीसीबी ग्रुप) प्रवेश परीक्षा दिली, तर इंजिनिअरिंग व कृषी अभ्यासक्रमासाठी २९,६२१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.
पीसीएम ग्रुपचे टाॅपर
विद्यार्थी गुण स्थान
सचिन काळे १०० नागपूर
शरयू देशमुख १०० अकोला
वेदांत तायडे ९९.९९ अकोला
प्रसन्ना नागे ९९.९७ बुलढाणा
वेदांत पारखे ९९.९६ अमरावती
आस्था चव्हाण ९९.९५ नागपूर
पीसीबी ग्रुपचे टाॅपर
विद्यार्थी गुण स्थान
अदिती टेंभुर्णीकर १०० नागपूर
नीरज काकरानिया १०० अमरावती
साकर बांडे ९९.९९ अकोला
भाग्यश्री बिलबिले ९९.९९ अकोला
प्राजक्ता लिहितकर ९९.९९ नागपूर
राजरतन दहिवडे ९९.९८ अमरावती
साक्षी मेश्राम ९९.९६ नागपूर
खुशी रणदिवे ९९.९३ नागपूर