नागपूर : दि एनर्जी ॲन्ड रिसाेर्सेस इन्स्टिट्यूट(टेरी)चे वरिष्ठ संचालक डाॅ. बनवारी लाल यांनी सूक्ष्मजैविक रेमिडिएशन हे भविष्यातील पर्यावरण स्वच्छतेचे तंत्र राहणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. कुवैतचे तेलसाठे तसेच भारतातील तेल कंपन्यांच्या आसपास तेलगळतीमुळे माेठा प्रदेश प्रदूषित हाेण्याचा प्रकार हाेत हाेता. शिवाय तेल वाहणाऱ्या पाईपलाईन गळतीद्वारे हाेणाऱ्या प्रदूषणामुळे शेतीचे नुकसान हाेत हाेते. टेरी संस्थेने तयार केलेल्या ‘ऑईलझॅपर’ नामक सूक्ष्मजैविक रेमिडिएशनमुळे माेठ्या प्रमाणात तेलगळतीचे प्रदूषण राेखण्यात यश आल्याची माहिती त्यांनी दिली.
राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशाेधन संस्था(नीरी)च्या वतीने माजी संचालक दिवंगत प्रा. पी. खन्ना यांच्या स्मृतिनिमित्त ‘सूक्ष्मजैव रेमिडिएशनचे पर्यावरण स्वच्छतेत महत्त्व’ विषयावर आयाेजित वेबिनारमध्ये ते बाेलत हाेते. सध्या भारतीय तेल कारखाने व कुवैतच्या तेलसाठ्यामध्ये ऑईलझॅपरचा उपयाेग केला जाताे. हे तेलगळतीच्या ठिकाणी ४ चाैरस किलाेमीटरच्या परिसरातील प्रदूषण नष्ट करण्यात सक्षम असल्याचे त्यांनी सांगितले. ते ८ ते ४० अंश तापमानात टिकाव धरू शकते आणि त्याचा पर्याय ४० टक्क्यांनी स्वस्त पडत असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी उपस्थित डाॅ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर विद्यापीठ, लखनौच्या पर्यावरण सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे प्रमुख डाॅ. राम चंद्रा यांनी फायटाेरेमिडिएशनसह नॅनाेपार्टिकल्सचे प्रदूषण नियंत्रणातील महत्त्व विशद केले. जैविक रेमिडिएशन व फायटाेरेमिडिएशनचा नॅनाेपार्टिकल्सशी संयाेगातून प्रदूषित क्षेत्राचे पुनरुज्जीवकरण करणे शक्य हाेऊ शकते. वेबिनारला नीरीच्या वरिष्ठ वैज्ञानिक डाॅ. साधना रायलू, आराेग्य व टाॅक्झिसिटी सेलचे प्रमुख डाॅ. के. कृष्णमूर्ती, डाॅ. कुंभारे प्रामुख्याने उपस्थित हाेते.