- चंद्रशेखर शेगावकर : एमआयएचा ३८ वा स्थापना दिन
नागपूर : एमआयडीसी हिंगणा येथील उद्योजकांना अनेक समस्या भेडसावत आहेत. त्या सोडविण्यासाठी राज्य शासन आणि एमआयडीसीकडे अनेकदा मांडल्या आहेत. पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असून त्याचा उद्योगांना फटका बसत आहे. शासनाने विविध समस्या निकाली काढाव्यात, असे आवाहन एमआयए हिंगणाचे अध्यक्ष चंद्रशेखर शेगावकर यांनी केले.
एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनचा (एमआयए, हिंगणा) ३८ वा स्थापनदिन एमआयए हाऊस, एमआयडीसी हिंगणा येथे साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. मुख्य अतिथी म्हणून जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर आणि व्यासपीठावर एमआयएचे सचिव सचिन जैन उपस्थित होते. ठाकरे यांच्या हस्ते डायनिंग हॉलचे उद्घाटन करण्यात आले.
कुंभेजकर म्हणाले, हिंगण्यात इको सिस्टिम बनला असून उत्कृष्ट पद्धतीने कार्य करीत आहे. सर्वांच्या एकजुटतेचा हा सकारात्मक परिणाम आहे.
कार्यक्रमात सर्वोतम कार्य करणाऱ्या उद्योगांचा सत्कार करण्यात आला. मिनी आयरन अॅण्ड स्टील प्रा.लि.चे व्यवस्थापकीय संचालक सुरेंद्र जयस्वाल, आकार इंडस्ट्रीजचे रमेश पटेल आणि अक्षय फर्निटेकच्या शिल्पा अग्रवाल यांना यंदाचा सर्वोत्तम उद्योजक पुरस्कार देण्यात आला. प्रारंभी मान्यवरांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. एमआयएचे पदाधिकारी एस.एम. पटवर्धन व अरुण लांजेवार यांनी आयोजनासाठी सहकार्य केले. सचिन जैन यांनी आभार मानले.
कार्यक्रमात असोसिएशनचे माजी अध्यक्ष कॅ. सी.एम. रणधीर, मयंक शुक्ला, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक गजेंद्र भारती, सहायक संचालक सुनील खुजनारे, एनएसआयसी नागपूरचे वरिष्ठ शाखा व्यवस्थापक कमल नायक, महावितरणचे कार्यकारी अभियंते प्रफुल्ल लांडे, एमआयडीसी हिंंगणाचे कार्यकारी अभियंते राजू बोरूडे, विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनचे (व्हीआयए) अध्यक्ष सुरेश राठी, बुटीबोरी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप खंडेलवाल, सीआयआय विदर्भ झोनल कौन्सिलचे चेअरमन राहुल दीक्षित, लघु उद्योग भारतीचे अध्यक्ष श्रीकांत धोंड्रीकर, व्हीआयए महिला विंगच्या अध्यक्षा मनीषा बावनकर, माजी अध्यक्ष रीता लांजेवार, एमआयए हिंगणाचे कार्यकारिणी सदस्य आणि १०० पेक्षा जास्त उद्योजक उपस्थित होते.