अर्धवट रस्ता ठरतोय डोकेदुखी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वाहतूक व नागरिकांना सुविधा व्हावी म्हणून रस्त्यांचे रुंदीकरण केले जाते; परंतु गाेरेवाडा ते गिट्टीखदान येथील सिमेंट रस्ता रुंदीकरणानंतरही नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. रुंदीकरणानंतर वॉटर लाइनचे मोठाले व्हॉल्व्ह चेंबर ऐन रस्त्याच्या मधोमध आले आहेत. त्यामुळे या परिसरातील नागरिकांच्या अडचणी कायम आहेत.
गोरेवाडा ते गिट्टीखदान दरम्यानाच्या रस्त्याच्या रुंदीकरणाची मागणी अनेक वर्षांपासून होत होती. तीन- चार वर्षांपूर्वी या रस्त्याच्या सिमेंटीकरणाला सुरुवात झाली; परंतु अतिशय मंद गतीने या रस्त्याचे काम चालले. अनेकदा काम बंद पडत राहिले. कसेबसे काम सुरू झाले आणि अर्धवट रस्ता बनवून कंत्राटदार मोकळा झाला. गोरेवाडापर्यंतचा हा रस्ता केवळ आदिवासीनगर ते एकतानगरपर्यंतच्या नाल्यापर्यंतच बनवण्यात आला. सध्या रस्त्याचे कामही बंद झाले आहे. एकूणच रस्ता अर्धवट बनलाच; परंतु जो रस्ता बनवला गेला तोसुद्धा परिपूर्ण केलेला नाही. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी किमान पाच ते सात फुटांचा भाग तसाच सोडून देण्यात आलेला आहे. त्यामुळे सिमेंट रोड व खाली खड्डा बनला आहे. परिणामी, आजूबाजूच्या दुकानात येणाऱ्या ग्राहकांना त्यांची वाहने रस्त्यांवरच उभी करावी लागतात. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते.
वाहतुकीची कोंडी ही आता रोजचीच बाब झाली आहे. याव्यतिरिक्त या रस्त्यावरची सर्वांत मोठी अडचण म्हणजे वॉटर लाइनचे व्हॉल्व्ह चेंबर हे होत. गोरेवाडा येथून मोठी पाण्याची लाइन गेली आहे. त्यावर मोठे व्हॉल्व्ह चेंबर होते. हे चेंबर रस्त्याच्या बाजूला होते; परंतु रस्ता रुंदीकरणामुळे ते आता रस्त्याच्या मधोमध आले आहेत.
हे चेंबरसुद्धा एक, दोन नाही, तर तब्बल चार ठिकाणी आहेत. या व्हॉल्व्ह चेंबरमुळे अनेक अपघातसुद्धा घडले आहेत.
- या रस्त्यावरील व्हॉल्व्ह चेंबरबाबत महापालिकेकडे अनेकदा तक्रार केली; परंतु मनपाने अजूनही याकडे लक्ष दिलेले नाही. यामुळे अपघातही घडले आहेत. एखादा मोठा अनर्थ घडण्यापूर्वी मनपाने ही बाब गांभीर्याने घेण्याची गरज आहे.
-ईश्वर बरडे, माजी नगरसेवक