संजय लचुरिया
नागपूर - महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरात मध्यरात्री आगीचा भडका उडल्याने एकच गोंधळ निर्माण झाला. शहरातील वर्धमान नगर येथील एका सायकल गोडाऊनमध्ये ही आग लागली होती. आगीचे नेमके कारण अद्याप समजले नसले तरी या आगीने मोठा पेट घेतल्याने गोडाऊनमधील मोठे साहित्य जळून खाक झाले आहे. या दुर्घटनेत गोडाऊन मालकाचे अंदाजे २ ते अडीच कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
वर्धमान नगर हा रहिवाशी परिसर असून येथील एका सायकलच्या गोडाऊनला रात्री १२.३० ते १ वाजताच्या सुमारास आग लागली. आगीने रौद्र रुप धारण केले होते. त्यामुळे, अग्निशमन दलाच्या जवळपास २० ते २२ गाड्यांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने या घटनते कुठलीही जिवितहानी झाली नाही. मात्र, परिसरातील स्थानिकांना या घटनेमुळे रात्र जागून काढवी लागली. परिसरातील काही घरांतील नागरिकांनी गॅस सिलेंडर घराबाहेर काढले, तर काहींच्या घरातील वस्तूही आगीत जळाल्या आहेत.
दरम्यान, महापालिका प्रशासनाने रात्रीपासूनच आग आटोकण्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केला. मात्र, आगीत मोठं नुकसान झालं असून सकाळी पंचनामा करण्यात येणार आहे.