नागपूर : मायग्रेन ही सामान्य समस्या आहे. पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये त्याचे प्रमाण अधिक आढळते. हार्मोन्समधील बदल, अपौष्टिक आहार, अतिताण, झोपण्याची व उठण्याची चुकीची सवय, औषधांचा अतिरेकी वापर आदी त्यामागे कारणे आहेत. यावर वेळीच उपचार आवश्यक आहे, असे मत डॉ. देबाशिष चौधरी यांनी व्यक्त केले.
इंडियन अकॅडमी ऑफ न्यूरोलॉजीतर्फे १८ ते २४ डिसेंबर दरम्यान ‘राष्ट्रीय मेंदू सप्ताह’ आयोजित करण्यात आला. यानिमित्ताने आठवडाभर विविध ऑनलाईन चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. ‘माझे आरोग्य, माझी जबाबदारी’ ही या वर्षीची संकल्पना आहे. चर्चासत्राच्या आज तिसऱ्या दिवशी डॉ. सुधीर कोठारी (पुणे), डॉ. देबाशिष चौधरी (नवी दिल्ली), डॉ. हृषिकेश कुमार (कोलकाता) सहभागी झाले होते.
औषधांबरोबर नियमित योगासने, व्यायाम, पौष्टिक आहार घेतला तर ही समस्या दूर केली जाऊ शकते असे सांगत डॉ. चौधरी म्हणाले, मायग्रेनवर इंजेक्शनही आले आहे. ते घेतल्याने एक महिना मायग्रेनपासून दूर राहता येते. त्यानंतरही ही समस्या दूर झाली नाही तर शस्त्रक्रियेचा पर्यायदेखील उपलब्ध आहे.
डॉ. सुधीर कोठारी यांनी ‘भोवळ येणे’ या विषयावर आपले विचार मांडले. त्यांनी भोवळ, चक्कर येणे म्हणजे काय, ती कशामुळे येते, त्याचे प्रकार कोणते, त्यावर उपाय काय आहेत, याबद्दल माहिती दिली. ते म्हणाले, शरीराचे संतुलन चांगले असते तेव्हा आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. पण संतुलन बिघडले की चक्कर येण्यासारख्या समस्या उद्भवतात. कानात असलेली सूक्ष्म प्रणाली शरीराचे संतुलन साधण्याचे काम करते. त्यात बिघाड झाला तर शरीराचे संतुलन बिघडते व चक्कर यायला लागतात.
‘गेट डिसऑर्डर्स’ या विषयावर डॉ. हृषिकेश कुमार यांनी विचार मांडले. ते म्हणाले, पायांचा नियमित व्यायाम केला, चालताना काळजी घेतली, डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घेतली तर बऱ्याच अंशी ही समस्या दूर होऊ शकते. ज्या व्यक्तींना नीट चालता येणे शक्य नसते, त्यांच्याप्रति सहानुभूती ठेवण्याचा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
अध्यक्षस्थानी हैदराबादचे आयएएनचे माजी अध्यक्ष डॉ. सुभाष कौल व एमडीएसआयचे अध्यक्ष डॉ. विनय गोयल होते. राष्ट्रीय मेंदू सप्ताहाचे राष्ट्रीय संयोजक डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी प्रास्ताविक केले व सर्वांचे आभार मानले.