नागपूर – राज्यातील विद्यार्थ्यांच्या हितासाठी आणि विद्यार्थ्यांची सामाजिकीकरणाची प्रक्रिया सुरळीत होण्याच्या दृष्टीने तसेच प्रत्येक विद्यार्थ्याचा शिक्षणाचा हक्क कायम राखण्यासाठीच राज्यातील ० ते १० पटसंख्या असलेल्या शाळा बंद नाही तर स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतल्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज विधानपरिषदेत स्पष्ट केले.
शिक्षक आमदारांनी केवळ खोटेनाटे आरोप करु नये आणि अपप्रचार करणारे लेखही छापून आणू नयेत असे स्पष्ट करतानाच तावडे म्हणाले की, आम्ही घेतलेला निर्णय हा फक्त विदयार्थ्यांच्या हितासाठी घेण्यात आला आहे. गुगल मॅपच्या सहाय्याने आणि प्रत्यक्ष सर्वेक्षण करुन या शाळा शोधण्यात आल्या आहेत. तरीही शिक्षक आमदारांनी कमी पटसंख्या असलेल्या शाळेचे स्थलांतर १ कि.मी. पेक्षा अधिक दूर अंतरावर झाले असल्याचे निर्दशनास आणून दिल्यास आपण ती नक्कीच दुरुस्त करु, असेही तावडे यांनी सभागृहात आश्वासन दिले. तरीही आमच्या विभागाच्या अधिका-यासोबत शिक्षक आमदारांनी त्यांचा एक कार्यकर्ता पाठविल्यास आम्ही त्या शाळेच्या अंतराचे नक्कीच सर्वेक्षण करु असेही तावडे यांनी स्पष्ट केले.