मेट्रो वाचविणार वेळ : चारचाकीला लागतो दीडतास : एसी, वायफायच्या सानिध्यात प्रवास मोरेश्वर मानापुरे । लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मेट्रो रेल्वे मिहान-खापरी डेपो ते आॅटोमोटिव्ह चौकापर्यंत (उत्तर-दक्षिण) १९.६६ कि़मी.चे अंतर ताशी ८० कि़मी. वेगाने ४० मिनिटांत कापणार आहे. यात रेल्वे स्टेशनवर थांबण्याच्या वेळेचाही समावेश आहे. हेच अंतर दुचाकी किंवा चारचाकीने जायचे झाल्यास तब्बल दीड तास लागतात. नागपूरकरांना या सुविधेचा लाभ डिसेंबर २०१९ नंतर मिळणार आहे. प्रवाशांची आर्थिक बचत महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पांतर्गत पूर्र्व-पश्चिम प्रजापतीनगर ते लोकमान्यनगर (१८.५६ कि़मी.) आणि उत्तर-दक्षिण आॅटोमोटिव्ह चौक ते मिहान-खापरी डेपो (१९.६६ कि़मी.) या दोन्ही मार्गाचे अंतर ३८.२१ कि़मी. राहणार आहे. आॅटोमोटिव्ह ते मिहान या मार्गावर १७ स्टेशन राहणार आहेत. हे अंतर कापण्यासाठी मेट्रो रेल्वेचा वेग ताशी ८० कि़मी. राहील. मिहान-खापरी डेपोतून गाडी निघाल्यानंतर प्रत्येक स्टेशनवर काहीच सेकंद थांबणार आहे. त्यानंतर गाडीचा वेग ताशी ४० कि़मी. आणि नंतर ताशी वेग ८० कि़मी.वर जाईल. मेट्रो रेल्वेने पूर्व-पश्चिम व उत्तर-दक्षिण अंतर कापण्यासाठी नागरिकांची आर्थिकदृष्ट्या बचत होणार असल्याची माहिती महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे (महामेट्रो) व्यवस्थापकीय संचालक बृजेश दीक्षित यांनी दिली. कोच आधुनिक सोयीसुविधांनी परिपूर्ण ‘सीआरआरसी’ या चीनच्या कंपनीतर्फे नागपुरात कोचेस बनविण्यात येणार असून निर्मितीचे काम सुरू झाले आहे. प्रत्येक मेट्रो रेल्वेमध्ये तीन कोच राहणार आहे. एकूण प्रवासी क्षमता ९७० एवढी राहील. प्रत्येक कोचमध्ये म्युझिक सिस्टिम, एसी, वायफाय सुविधा, टीव्ही, लॅपटॉप आणि मोबाईल फोनसाठी चार्जिंग पॉर्इंट आदींसह प्रवाशांसाठी अनोख्या सुविधा राहतील. याशिवाय प्रवाशांना पुढील स्टेशनच्या माहितीसह आवश्यक माहिती वेळोवेळी मिळणार आहे. प्रवाशांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रत्येक कोचमध्ये सहा एलईडी स्क्रीन राहतील. तसेच विशेष यंत्रणेने प्रवाशांना रेल्वे पायलटसोबत संपर्क साधता येईल. तसेच आगप्रतिबंधक उपकरणांसह सुरक्षेच्या दृष्टीने आधुनिक वैशिष्ट्ये कोचमध्ये राहणार आहे. महिला आणि वरिष्ठ नागरिकांना बसण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. सीबीटीसीवर आधारित सिग्नल सिस्टिम, प्रत्येक दरवाज्यावर डिजिटल डिस्प्ले, प्रवाशांना मार्गदर्शक ठरणारे लाईट, आॅटोमेटिव्ह दरवाजे, कोचच्या बाहेरही सुरक्षेसाठी उपकरणे लावण्यात येणार आहे. अन्य मेट्रो रेल्वेच्या तुलनेत नागपुरात कोचची रुंदी कमी अर्थात २.९ मीटर राहणार असल्याचे दीक्षित यांनी स्पष्ट केले.
मिहान ते आॅटोमोटिव्ह चौक ४० मिनिट
By admin | Published: June 07, 2017 1:53 AM