लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मंगळवारी पहाटे नागपूरलाभूकंपाचा सौम्य धक्का बसला. याची तीव्रता फारच कमी होती. ‘नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी’ने दिलेल्या माहितीनुसार, नागपूरपासून ९६ किलोमीटर दूर सिवनीजवळ भूकंपाचा केंद्रबिंदू होता व भूकंपाची तीव्रता ही रिश्टर स्केलवर ३.३ इतकी होती.
सकाळी ४ वाजून १० मिनिटाच्या आसपास हा धक्का जाणवला. सिवनी येथे जमिनीच्या १५ किलोमीटरच्या आत याचा केंद्रबिंदू होता. या भूकंपामुळे कुठलेही नुकसान झाले नाही. मात्र दिवसभर भूकंपाची नागरिकांमध्ये चर्चा होती.
अशी असते भूकंपाची तीव्रता
० ते १.९ रिश्टर स्केल : सीज्मोग्राफमध्ये होते नोंद.
२ ते २.९ रिश्टर स्केल : हलका धक्का जाणवतो.
३ ते ३.९ रिश्टर स्केल : जवळून एखादा ट्रक गेल्याप्रमाणे धक्का जाणवतो.
४ ते ४.९ रिश्टर स्केल : खिडक्यांची तावदाने तुटू शकतात, भिंतींवरील फ्रेम्स खाली पडू शकतात.
५ ते ५.९ रिश्टर स्केल : फर्निचर हलू शकते.
६ ते ६.९ रिश्टर स्केल : इमारतीला नुकसान होऊ शकते.
७ ते ७.९ रिश्टर स्केल : इमारती कोसळू शकतात. जमिनीच्या आतील पाईप्सचे नुकसान होते.
८ ते ८.९ रिश्टर स्केल : इमारतींसह मोठे पूलदेखील पडू शकतात.
९ किंवा त्याहून अधिक : मोठे नुकसान. जमिनीवर धक्के स्पष्टपणे जाणवतात. समुद्रात त्सुनामी येण्याची शक्यता.