टोळी जेरबंद : ठाणे पोलिसांची नागपूर, पुणे, गोव्यामध्ये कारवाई; ३५० जण ताब्यात साडेसतरा कोटींचा घोटाळा; बडे लष्करी अधिकारीही सहभागी नागपूर/ठाणे/पुणे/पणजी : सैन्यभरती परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेची चार ते पाच लाखांमध्ये विक्री करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने पर्दाफाश केला आहे. पुणे, नागपूर आणि गोवा येथे छापा टाकून १९ जणांना अटक करण्यात आली असून ३५० उमेदवारांना ताब्यात घेतल्याची माहिती ठाण्याचे सहपोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. यातून सुमारे १७ कोटी ५० लाखांचा घोटाळा उघड होण्याची तसेच रॅकेटमध्ये सैन्य दलातील बडे अधिकारी सहभागी असण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे. सैन्य दलातील तंत्रज्ञ, ड्राफ्ट्समन आणि लिपिकासह चार वेगवेगळ्या पदांसाठी रविवारी देशभरात विविध केंद्रांवर लेखी परीक्षा होणार होती. या परीक्षेची प्रश्नपत्रिका मिळवून देण्यासाठी तसेच ज्या जिल्ह्यात परीक्षा होणार आहे, तेथील निवासी प्रमाणपत्र मिळवून देणारे दलाल ठाण्यातील काही परीक्षार्थ्यांना भेटले होते. त्यासाठी एका उमेदवाराकडून त्यांनी चार ते पाच लाख रुपये घेतल्याची खबर ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-१ च्या अधिकाऱ्यांना शुक्रवारी मिळाली होती. याच माहितीच्या आधारे पोलीस आयुक्त परमवीर सिंग आणि सहपोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, उपआयुक्त पराग मणेरे, सहायक पोलीस आयुक्त मुकुंद हातोटे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे पोलिसांनी चार पथके नेमली. या पथकांनी शनिवारी मध्यरात्री १२ ते रविवारी पहाटे ४ या कालावधीत पुण्याच्या फुरसुंगी, नागपूरच्या सुयोगनगर, अजनी परिसरातील मौर्य समाज सभागृह आणि गोव्यातील वाघाटोर बीच अशा तीन ठिकाणी छापे टाकले. या कारवाईदरम्यान प्रश्नपत्रिका फोडून तिची विक्री करणाऱ्या १९ जणांना अटक करण्यात आली असून ३५० उमेदवारांना ताब्यात घेण्यात आले आहे. १९ आरोपींमध्ये सैन्यातील एका निवृत्त अधिकाऱ्यासह निमलष्करी दलातील एका निवृत्त अधिकाऱ्याचाही समावेश आहे. २४ मोबाईल आणि दोन वाहने जप्त गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या पथकाने नागपूर येथील छाप्यात १० मोबाईल आणि दोन वाहने जप्त केली आहेत. पुण्यातील छाप्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र डोईफोडे यांच्या पथकाने ११ मोबाईल आणि काही प्रश्नपत्रिका हस्तगत केल्या आहेत, तर गोवा येथील छाप्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांच्या पथकाने तीन मोबाईल, ५७ हजारांची रोकड आणि दोन प्रश्नपत्रिका हस्तगत केल्याची माहिती सूत्रांनी दिली. गोव्यात ९८ लाखांचा सौदा गोव्यात हणजुणे येथे पोलिसांनी छापा टाकून तिघांना रंगेहाथ पकडले. त्यांना ठाणे गुन्हा अन्वेषण विभागाच्या स्वाधीन केल्याची माहिती पोलीस उपमहानिरीक्षक विमल गुप्ता यांनी ‘लोकमत’ला दिली. गोव्यातील परीक्षा केंद्रात परीक्षा देणाऱ्या उमेदवारांपैकी ४९ जणांशी संपर्क साधून एका बारमध्ये त्यांच्याशी आर्थिक वाटाघाटी सुरू असतानाच पोलिसांनी ही कारवाई केली. एका उमेदवाराला एक पेपर दोन लाख रुपयांना विकला जाणार होता. याप्रमाणे हा ९८ लाखांचा सौदा होणार होता. पुण्यात नऊ जण ताब्यात ठाणे पोलिसांनी पुणे गुन्हे शाखेच्या मदतीने हडपसर येथील भेकराईनगरमधील एका हॉलवर छापा टाकून नऊ जणांना अटक केली तर, ७९ उमेदवारांना ताब्यात घेतले. या उमेदवारांना तीन लाख रुपयांच्या बदल्यात प्रश्नपत्रिका देण्यात आली. पोलिसांनी ताब्यात घेतलेला धनाजी मोहन जाधव (रा. फलटण) हा सैन्य भरतीसाठी क्लासेस घेतो. जाधववर यापूर्वीही सैन्य दलातील भरती घोटाळ्यासंदर्भात गुन्हा दाखल आहे़ असे चालायचे रॅकेट सैन्य दलाच्या परीक्षेस बसलेल्यांना या टोळीतील काही दलाल हेरायचे. ठाण्याच्या परीक्षार्थ्याला पुणे किंवा नागपूर येथील केंद्रावर परीक्षा द्यायची असेल, तर तेथील रहिवासी दाखलाही ते मिळवून द्यायचे. या दाखल्यासह प्रश्नपत्रिका चार ते पाच लाखांना देण्याचा सौदा निश्चित व्हायचा. वेगवेगळ्या केंद्रांवरील या परीक्षार्थ्यांना अज्ञातस्थळी ठेवून तिथे व्हॉट्सअॅपवर ही प्रश्नपत्रिका पाठवली जायची. त्या परीक्षा केंद्रासाठी असलेला टोळीप्रमुख मग त्या प्रश्नपत्रिकेचे प्रिंटआऊट काढून विक्री करीत होता.(लोकमत न्यूज नेटवर्क)
सैन्य भरतीचा पेपर फुटला; १९ अटकेत
By admin | Published: February 27, 2017 1:41 AM