लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गुवाहाटीवरून सैन्यदलाचे साहित्य घेऊन आंध्र प्रदेशातील बापटला येथे जात असलेल्या मिलिटरी स्पेशल रेल्वेगाडीची चार चाके नागपूर यार्डात डी कॅबिनजवळ रुळावरून घसरल्यामुळे मंगळवारी दुपारी एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. युद्धपातळीवर घसरलेली चाके रुळावर आणण्याचे काम सुरू झाले. दुपारी ४ वाजेपर्यंत घसरलेल्या वॅगनची चाके रुळावर आणण्यात यश मिळाले. सुदैवाने मेन लाईनवर ही घटना घडली नसल्यामुळे या घटनेचा रेल्वे वाहतुकीवर फारसा परिणाम झाला नाही.मंगळवारी दुपारी सैन्यदलाचे साहित्य घेऊन मिलिटरी स्पेशल रेल्वेगाडी आंध्र प्रदेशातील बापटलाकडे जात होती. या स्पेशल गाडीला ३४ वॅगन आणि कोच होते. यात मिलिटरीचे ट्रक, मोठे जनरेटर आदी साहित्य होते तर कोचमध्ये मिलिटरीचे अधिकारी आणि जवान होते. ही गाडी मेन लाईनवरून दुपारी १.२५ वाजता नागपूर रेल्वे स्थानकाच्या यार्डात शिरताच डी कॅबिनजवळ या गाडीच्या ५०११९० आणि ८६०४४३ क्रमांकाच्या वॅगनची चार चाके रुळावरून घसरली. घटनेची माहिती रेल्वेच्या नियंत्रण कक्षाला देण्यात आली. माहिती मिळताच रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक मनिंदर सिंह उप्पल, अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक त्रिलोक कोठारी, एन. के. भंडारी, वरिष्ठ विभागीय अभियंता पवन पाटील, वरिष्ठ विभागीय यांत्रिक अभियंता अखिलेश चौबे, रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योती कुमार सतीजा, निरीक्षक वीरेंद्र वानखेडे घटनास्थळी पोहोचले. लगेच रुळावरून घसरलेल्या वॅगनची चाके रुळावर आणण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले. तब्बल अडीच तासानंतर दुपारी ४ वाजता रुळावरून घसरलेली वॅगनची चाके रुळावर आणण्यात यश आले. त्यानंतर ही गाडी पुढील प्रवासासाठी रवाना झाली. ही घटना डी कॅबिनजवळ यार्डात घडली. यामुळे हावडा मार्गावरील १२९९४ पुरी-गांधीधाम एक्स्प्रेस, १८०९४ लोकमान्य टिळक टर्मिनस-शालिमार एक्स्प्रेस आणि १२२१४ दिल्ली-यशवंतपूर दुरांतो एक्स्प्रेस या तीन गाड्यांना अर्धा तास विलंब झाला.