लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत विदर्भ व मराठवाड्यात दुधाची अर्थव्यवस्था विकसित नाही. मार्केटिंग व्यवस्थेच्या माध्यमातून विदर्भात २५ लाख टन उत्पादन निश्चित केले आहे. या दूध क्रांतीमुळे विदर्भ आणि मराठवाड्यात शेतकरी सधन होऊन अर्थव्यवस्था विकसित होईल. त्यामुळे या भागातील एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही, असा विश्वास केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले.मदर डेअरीच्या ऑरेंज मावा बर्फीच्या उद्घाटनप्रसंगी गडकरी बोलत होते. यावेळी मेट्रोच्या एअरपोर्ट स्टेशनवर मदर डेअरीच्या बूथचे रिमोटने उद्घाटन करण्यात आले. व्यासपीठावर केंद्रीय पशुपालन, दुग्धव्यवसाय व मत्स्यपालन मंत्री गिरीराज सिंग, राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डचे अध्यक्ष दिलीप रथ, मदर डेअरीचे व्यवस्थापकीय संचालक संग्राम चौधरी, महाव्यवस्थापक लक्ष्मीनारायण मिश्रा, प्रकल्प संचालक रवींद्र ठाकरे आणि महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आशिष पातुरकर उपस्थित होते.गडकरी म्हणाले, विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजेत. त्यासाठी शेतीत उत्पादन आणि पूरक उद्योग वाढावेत. दूध उत्पादन वाढले पाहिजे. उत्पादन वाढले तर प्रक्रिया करून विकले गेले पाहिजे. यावर मदर डेअरी चांगले काम करीत आहे. विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव्यात, ही त्यामागील भावना आहे. मदर डेअरीमुळे दूधाचे उत्पादन वाढले आहे. दुधावर आधारित उत्पादनाच्या विक्रीसाठी मदर डेअरीने जो विकेल त्यांना बूथ द्यावे. विदर्भात ८४ सेंटर असून त्यापैकी नागपुरात ५५ आहेत. चांगल्या उत्पादनासाठी मार्केटिंगची गरज नाही. ऑरेंज बर्फी देशात प्रसिद्ध होईल, असा विश्वास आहे. गाईचे दूध आणि मधापासून वर्धा येथे तयार होणाऱ्या गोरस बिस्किटचे उत्पादन मदर डेअरीने मोठ्या प्रमाणात करावे, असे गडकरी यांनी सांगितले.
‘अॅग्री विथ लाईव्ह स्टॉक’ हाच मूलमंत्र : गिरीराज सिंग शेतकऱ्यांच्या आत्महत्येसाठी विदर्भाचा उल्लेख होतो, तेव्हा वाईट वाटते. शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये. माझ्या मंत्रालयातर्फे शेतकऱ्यांचे उत्पन्न कसे वाढेल, यावर भर देण्यात येत आहे. शेतकऱ्यांचे उत्पादन मूल्यवर्धित व्हावे. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद राहील, तेव्हाच देश अर्थव्यवस्थेत पुढे जाईल. विभागातर्फे जास्त दूध देणाऱ्या गाई तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे दुधाचे उत्पादन वाढले. मदर डेअरीमुळे शेतकऱ्यांकडून दुधाचे संकलन वाढले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होत आहे. शेतकऱ्यांनी पुरक व्यवसाय करावा. ‘अॅग्री विथ लाईव्ह स्टॉक’ माझा मूलमंत्र असल्याचे गिरीराज सिंग म्हणाले.दिलीप रथ म्हणाले, मदर डेअरीतर्फे नागपुरातून १२०० मेट्रिक टन संत्री खरेदी केली. यावर्षी ७६० टन खरेदी करून दिल्लीत नेणार आहे. नागपुरातील मदर डेअरीमध्ये १० जिल्ह्यातील ३० हजार शेतकऱ्यांकडून २ लाख लिटर दूध संकलित करण्यात येते. त्यावर प्रक्रिया करून ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यात येते. आतापर्यंत शेतकऱ्यांना बँकेद्वारे ४७० कोटी रुपये दिले आहेत.