नागपूर : गणेशोत्सवात मिठाईचे दर १० ते २० टक्क्यांनी वाढतात, असा अनुभव आहे. यंदा दूध, साखर, खोवा, काजू, रंग या कच्च्या मालाच्या दरात फारशी वाढ न होताही विक्रेत्यांनी दर वाढविले आहेत. त्याचा फटका गरीब आणि सर्वसामान्यांना बसत आहे. घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव कोरोना नियमांतर्गत साजरा करण्यात येत असतानाही प्रत्येक घरी दरदिवशी पाव, अर्धा वा किलो मोदक पेढे व अन्य मिठाई खरेदी केली जाते. त्याचा फायदा विक्रेते घेतात. दरवाढीवर नियंत्रण कुणाचे आणि किती विक्रेत्यांवर भेसळीची कारवाई होते, यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
एफडीए कायद्यानुसार विक्रेत्याला मिठाईच्या ट्रेवर ‘बेस्ट बिफोर’ अर्थात मिठाईचे उत्पादन आणि एक्स्पायरी तारीख लिहावी लागते. काही विक्रेत्यांकडे मिठाईवर तारखेचा उल्लेख नसतोच. अशा विक्रेत्यांवर कारवाई होत नसल्याने विक्रेते तारीख गेल्यानंतरची मिठाईची विक्री करतात. त्या ग्राहकांची फसवणूक होते. अशा विक्रेत्यांवर भेसळ कायद्यांतर्गत कारवाई करून दंड वसूल करावा आणि दुकाने सील करावी, अशी मागणी काही ग्राहकांनी केली आहे.
मिठाईचे दर (प्रति किलो)
मिठाईसध्याचा दर गणेशोत्सवाआधी
पेढे ५८० ५२०
बर्फी ६०० ५४०
गुलाबजामून १२० १००
काजू कतली ७४० ७००
मोतीचूर लाडू २८० २४०
का दर वाढले?
नंदनवन भागातील स्वीट मार्ट चालक म्हणाले, खोवा, दूध, काजूचे दर, कारागिरी आणि विजेचे दर वाढल्यामुळेच मिठाईची दरवाढ झाली आहे. मिठाई नेहमीच थंड जागेत ठेवावी लागते. दूध आणि खोव्याची मिठाई जास्त दिवस टिकत नाही. थोडाफार नफा घेऊन मिठाईची विक्री करतो.
वर्धा रोडवरील हॉटेलचालक म्हणाले, कच्च्या मालाचे दर वाढल्यानंतरच दरवाढ करतो. सध्या दुधासह सर्वच कच्च्या मालाचे दर वाढले आहेत. कारागिरी दुप्पट झाली आहे. नफा मिळत असेल तरच मिठाईची विक्री करण्यात अर्थ आहे. गणेशोत्सवात पेढ्याला, मोदकला मागणी असते.
भेसळीकडे लक्ष असू द्या :
धार्मिक उत्सवात लोकांचा मिठाई खरेदीकडे जास्त कल असतो. काही विक्रेते भेसळयुक्त खाद्यपदार्थांची विक्री करतात, पण त्यांच्यावर कारवाई होत नाही. ग्राहकही खरेदी करताना जागरूकतेने लक्ष देत नसल्याने विक्रेत्यांचे फावते. अन्न प्रशासन विभागाकडे पुरेसे अधिकारी व कर्मचारी नसल्यामुळे शहरात बहुतांश परिसरात कारवाई होत नाही. त्यामुळे लोकांनीच भेसळीकडे जागरूकतेने लक्ष देण्याची गरज आहे.
ग्राहक म्हणतात :
उत्सवात लोकांनी मिठाई जागरूकतेने खरेदी करावी. गणेशाला नैवेद्यासाठी पेढ्याचे मोदक खरेदी करावे लागतात. मिठाई नेहमीच्या हॉटेलमधून खरेदी करतो. त्यामुळे भेसळीचा प्रश्नच येत नाही. पण खरेदीवेळी लोकांनी दक्ष असावे.
महेंद्र आदमने, ग्राहक
मिठाई महाग असल्याने दरदिवशी खरेदी करणे परवडत नाही. त्यामुळे घरीच तयार केलेले पक्वान्न नैवेद्य म्हणून ठेवतो. स्थापना आणि विसर्जन करताना पेढ्याचे मोदक नामांकित हॉटेलमधून खरेदी करतो. सध्या खाद्यपदार्थांमध्ये भेसळ वाढली आहे.
मीनल श्रीवास्तव, गृहिणी
दरांवर नियंत्रण कोणाचे?
भेसळयुक्त पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे अधिकार अन्न प्रशासन विभागाला आहेत. कारवाईदरम्यान अनेकदा दंडही वसूल करण्यात येतो. कच्च्या मालाच्या दरानुसार तयार मिठाई वा खाद्यपदार्थांची कोणत्या भावात विक्री करावी, ते अधिकार विक्रेत्यांना आहेत.
जयंत वाणे, सहआयुक्त (प्रभारी, अन्न), अन्न व औषधी प्रशासन विभाग