नागपूर : राज्यातील दूध उत्पादक शेतक-यांना पाच रुपये प्रतिलिटर दरवाढ करून दिलीच पाहिजे, अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, माजी उपमुख्यमंत्री नेते अजित पवार यांनी आज विधानभवन परिसरात केली. विधान भवनाच्या पाय-यांवर उभे राहून त्यांनी घंटानाद करत सरकारच्या धोरणांचा निषेध केला. स्थगनप्रस्तावाद्वारे आम्ही आज दुग्ध उत्पादक शेतक-यांनी पाच रुपये दरवाढ मिळावी यासाठी पुकारलेल्या आंदोेलनाला पाठिंबा देत आहोत. सरकारला शेतक-यांशी काही घेणेदेणे नाही म्हणून आम्ही गायीच्या गळ्यातील घंटा हे प्रतीक म्हणून घंटानाद आंदोलन करत आहोत, असे अजित पवार म्हणाले.
भाजपा सरकार शेतकरीविरोधी आहे हे यातून स्पष्ट झाले आहे. दुग्ध उत्पादकांना न्याय मिळालाच पाहिजे, अशी आमची मागणी आहे. कर्नाटक आणि गोवा सरकार शेतक-यांना ज्या धोरणानुसार मदत देते ते धोरण महाराष्ट्र सरकारनेही लागू करावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. सरकारने दुधाच्या भुकटी व्यवसायाला पाच रुपयांची दरवाढ दिली आहे. मात्र महाराष्ट्रात दुधाची भुकटी करणा-या खासगी संस्थांनाच त्याचा लाभ मिळेल. शेतक-याला त्याचा थेट फायदा होणार नाही, असेही ते यावेळी म्हणाले.