लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर रेल्वे स्थानकावरून सुटलेल्या मिलेनियम एक्स्प्रेसमध्ये रात्री उशिरा मुलताई आणि आमलादरम्यान प्रवाशांसोबत लुटमारीची घटना घडल्याची माहिती असून, आरोपी रेल्वे सुरक्षा दलाची नजर चकवून फरार होण्यात यशस्वी झाले.लुटमार झालेल्या प्रवाशात गांधीबाग येथील सय्यद काशीफ नकवी आणि त्यांच्या पत्नी समीना नकवी यांचा समावेश आहे. सय्यद काशीफ नकवी यांच्या मते, रेल्वेगाडी क्रमांक १२६४५ एर्नाकुलम-निजामुद्दीन मिलेनियम एक्स्प्रेस सोमवारी रात्री १२.३० वाजता नागपूरवरून रवाना झाली. ते आपली पत्नी आणि मुलीसोबत एस ८ कोचच्या बर्थ क्रमांक ६ आणि ७ वरून प्रवास करीत होते. रात्री उशिरा ३.१५ वाजता मुलताई आणि आमलादरम्यान अचानक त्यांची पत्नी समीना जोरात ओरडू लागली. त्यामुळे काशीफ यांनी वरच्या बर्थवरून उडी मारली. दरम्यान खिडकीच्या बाहेरून एक जण त्यांची बॅग हिसकावत होता. परंतु त्याला यात यश मिळाले नाही. परंतु आरोपी समीना यांच्या पायातील तोरड्या नेण्यात यशस्वी झाला. तेवढ्यात दुसऱ्या कोच एस ६ मधून जोरात ओरडल्याचा आवाज आला. एका प्रवाशाने चेनपुलिंग करून गाडी थांबविली. काशीफ यांनी कोचचा दरवाजा उघडल्यानंतर ५ ते १० जणांनी हातात बॅटरी, काठ्या घेऊन गाडीतून उडी मारल्याचे त्यांना दिसले. ते प्रवाशांवर दगडफेक करीत होते. यात काशीफ यांच्या खांद्याला दुखापत झाली. या घटनेमुळे घाबरून एस ६ ते एस ९ पर्यंतच्या प्रवाशांनी आपल्या कोचची दारे, खिडक्या बंद केल्या. गाडीतील टीटीईलाही काय झाले, हे समजले नाही. गाडी बैतूलला पोहोचल्यानंतर आरपीएफच्या ३ जवानांसोबत प्रवाशांनी इटारसीपर्यंत प्रवास केला. या घटनेबाबत आरपीएफ आमलाचे निरीक्षक सुरेंद्र कोष्टा यांनी सांगितले की, मिलेनियम एक्स्प्रेसमध्ये अचानक चेनपुलिंग करून गाडी थांबविल्यानंतर आरपीएफ जवान बॅटरी, दंडे घेऊन गाडीत चढले. तेवढ्यात एक आरोपी त्यांना पाहून पळत होता. पाठलाग केला असता बॅग सोडून पळून जाण्यात तो यशस्वी झाला. ही बॅग होशंगाबादच्या प्रवाशाची असल्याचे समजताच प्रवाशास परत करण्यात आली.
मिलेनियम एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांची लुटमार : आरपीएफची नजर चुकवून आरोपी फरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 1:07 AM