लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘पॅन कार्ड क्लब’च्या माध्यमातून हॉटेल व्यवसायात गुंतवणूक करायला लावून लोकांची कोट्यवधी रुपयाने फसवणूक करण्यात आल्याचा प्रकर उघडकीस आला आहे. गुन्हे शाखा पोलिसांच्या तपासानंतर गणेशपेठ पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.पॅन कार्ड क्लबची सुरुवात २००७ मध्ये मुंबई येथून झाली. सुधीर मोरावेकर रा. मुंबई हा याचा मुख्य सूत्रधार आहे. मोरावेकरने देशातील अनेक शहरांमध्ये पॅन कार्ड क्लबची शाखा सुरू केली. हा क्लब लोकांना हॉटेल व्यवसायात गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित करीत होता. गुंतवणूकदारांना क्लबचे स्वत:चे हॉटेल असून अनेक हॉटेलसोबत करार असल्याचे सांगितले जात होते. एका रात्रीचे किमान भाडे ९०० रुपये होते. गुंतवणूकदारांना कमीत कमी तीन रात्रींचे २७०० रुपये जमा करण्यास सांगितले जात होते. आपल्या क्षमतेनुसार जास्तीत जास्त कितीही रुपयांची गुंतवणूक करता येऊ शकत होती. याप्रकारे तीन वर्षे, साडेसहा वर्षे आणि ९ वर्षापर्यंतच्या योजना सुरू करण्यात आल्या होत्या. गुंतवणूकदारांनी हॉटेल बुक न केल्यास तीन वर्षासाठी किमान २७०० रुपयावर ३७०० रुपये परत केले जात होते. गुंतवणूक केलेल्या रकमेवर ‘रिटर्न्स’ दिले जात होते. गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी एजंटही नियुक्त करण्यात आले होते. त्यांना दीड ते पाच हजार टक्केपर्यंत कमिशन दिले जात होते.पॅन कार्ड क्लबचे नागपुरातील कार्यालय गणेशपेठ येथील आग्याराम देवी चौकात होते. या कार्यालयाला सुधीर मोरावेकर व राघो लालाजी इंदोरकर हे इतर लोकांच्या मदतीने चालवित होते. ते योजनांची माहिती देऊन गुंतवणूक करण्यास लोकांना तयार करायचे. सेवानिवृत्त बँक कर्मचारी रुपचंद भैसारे (६६) रा. बँक कॉलनी नारी रोड यांनीही ५५ हजार रुपयाची गुंतवणूक केली होती. त्यांच्याप्रमाणेच हजारो लोकांनी वेगवेगळी रक्कम यात गुंतवली होती. बहुतांश लोकांनी हॉटेलमध्ये थांबण्याचा कुठलाही ‘प्लॅन’ नसतानाही केवळ गुंतवणूक म्हणून पैसे जमा केले होते. याबाबत माहिती होताच २०१४ मध्ये सेबीने या योजनेला ‘कलेक्टिव्ह इनव्हेस्टमेेंट स्कीम’ असल्याचे सांगत गुंतवणुकीची रक्कम स्वीकारण्यावर बंदी घातली होती. यानंतर पॅन कार्ड क्लबचा व्यवसाय बंद पडला. नागपूरचे कार्यालयसुद्धा बंद करून सुधीर मोरावेकर आणि त्याचे साथीदार फरार झाले.यानंतर गुंतवणूकदार चकरा मारत फिरत होते. नागपूर, अमरावती, मुंबईसह अनेक शहरातील गुंतवणूकदारांनी पॅन कार्ड क्लबच्या विरुद्ध तक्रारी दाखल केल्या. वर्षभरापूर्वीच मुंबईतील दादर येथे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. भैसारे यांच्यासह १० गुंतवणूकदारांनी आर्थिक गुन्हे शाखेत तक्रार दाखल केली. डीसीपी श्वेता खेडकर यांच्या मार्गदर्शनाखली निरीक्षक ललित वर्टीकर यांनी प्रकरणाची चौकशी केली. त्या आधारावर गुरुवारी गणेशपेठ पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. फसवणुकीचा प्रकार समोर आल्यानंतर तब्बल चार वर्षांनी हा गुन्हा दाखल झाला आहे.नागपुरात बनवले हजारो सदस्यमुंबईच्या दादर येथे दाखल प्रकरणाची सुरुवात केवळ ५० हजार रुपयापासून झाली होती. आता फसवणुकीची रक्कम ५५ कोटी रुपयापर्यंत पाहोचली आहे. आतापर्यंत ६५०० गुंतवणूकदार दादर पोलीस ठाण्यात पोहोचले आहेत. त्याचप्रकारे नागपुरातही हजारो लोकांना पॅन कार्ड क्लबचे सदस्य बनवण्यात आल्याची माहिती आहे. सध्या १० गुंतवणूकदार समोर आले आहेत. येत्या दिवसात यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.२६ कोटीची उलाढालसूत्रानुसार पॅन कार्ड क्लब नागपूर शाखेचे सीताबर्डी येथील बँक आॅफ महाराष्ट्र येथे खाते होते. या खात्याची उलाढाल २६ कोटी रुपये इतकी होती. कार्यालय बंद झाल्यानंतर ही रक्कम काढण्यात आली. या घोटाळ्याचा सूत्रधार सुधीर मोरावेकर याचा वर्षभरापूर्वीच मृत्यू झाला आहे. त्याने जवळच्या लोकांच्या नावाने संपत्ती खरेदी केली असल्याचेही सांगितले जाते.