लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदेशातून सडक्या सुपारीची तस्करी करून आरोग्यास घातक असलेली ही सुपारी नागपुरातून वेगवेगळ्या भागात पाठविणाऱ्या एका सुपारी व्यावसायिकाचे दोन ट्रक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी ताब्यात घेतले. या ट्रकमध्ये ४८ लाखांची सुपारी असल्याचे दिसून आल्यानंतर पोलिसांनी आज एका ट्रान्सपोर्टरच्या गोदामात छापा घातला. तेथेही लाखोची सुपारी आढळल्यामुळे अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाला बोलावून पोलिसांनी कारवाई सुरू केली. गेल्या ३० तासांपासून लकडगंजमध्ये सलगपणे ही कारवाई सुरू आहे. त्यामुळे सडक्या सुपारीची तस्करी करणाºयामध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.इंडोनेशियासारख्या देशात सडलेली सुपारी फेकून दिली जाते. ही सुपारी कंटेनरमध्ये भरून तस्कर नागपुरात आणतात. तिच्यावर रासायनिक प्रक्रिया केली जाते. कळमनयात सुपारीवर रासायनिक प्रक्रिया करणारे अनेक कारखाने आहेत. तेथून आरोग्यास घातक असलेली ही सुपारी विक्रीसाठी विविध ठिकाणी पाठविली जाते. गेल्या अनेक वर्षांपासून हा गोरखधंदा सुरू असून त्यातून नागपुरातील अनेक दलाल गब्बर बनले आहेत. बुधवारी रात्री कुख्यात अल्ताफ सुपारीचे ट्रक घेऊन आल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने यांना कळली. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना लगेच कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार परिमंडळ तीनचे पथक प्रमुख पोलीस निरीक्षक विनोद चौधरी आपल्या सहकाºयांसह कारवाईसाठी लकडगंजमधील फ्री झोनकडे धावले. मात्र, अल्ताफला कारवाईची कुणकूण लागल्यामुळे तेथून त्याने आपले सुपारी भरलेले ट्रक पळवून नेले. मात्र, कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांना दुसºया एका व्यावसायिकाचे दोन ट्रक सापडले. गुरुवारी दिवसभर पोलिसांनी या ट्रकमधील सुपारीची तपासणी केली. ट्रकमध्ये ४८ लाख रुपयांची सुपारी असल्याचे समजते. दरम्यान, पोलिसांनी कारवाईसाठी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाºयांना माहिती कळविली. मात्र सुट्टीचा दिवस असल्याची सबब सांगून त्यांनी गुरुवारी कारवाई येण्यास टाळले. तिकडे पोलिसांनी ट्रक ताब्यात घेऊन आज शुक्रवारी पुन्हा नव्याने अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकासह कारवाई सुरू केली. एका ट्रान्सपोर्टरच्या गोदामात छापा घालण्यात आला. तेथेही मोठ्या प्रमाणात सुपारी आढळली. त्यामुळे पोलीस तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाचे पथक रात्री ८ पर्यंत ट्रान्सपोर्टरच्या गोदामात सुपारीचे मोजमाप आणि तपासणी करीत होते.विशेष म्हणजे, सडक्या सुपारीच्या या गोरखधंद्यात नागपुरातील अनेक गुंड सहभागी आहेत. ते वेगवेगळ्या पद्धतीने पोलिसांना कारवाई करू नये म्हणून अडचण निर्माण करतात. अनेकदा राजकीय दबावही आणला जातो. तो चालत नसेल तर चिरीमिरी देण्याघेण्याचीही भाषा वापरतात.---अल्ताफच्या उलट्या बोंबाअशाप्रकारे आपले काम काढून घेण्यासाठी अल्ताफ नामक गुंड या गोरखधंद्यात कुख्यात आहे. त्याचे नेटवर्कही मोठे आहे. तो नागपूर, महाराष्ट्रच नव्हे तर छत्तीसगड, तेलंगणा, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेशातही सडकी सुपारी पोहोचवतो. महिन्याला कोट्यवधींची उलाढाल करणारा अल्ताफ याने आपल्या गोरखधंद्याच्या सुरक्षिततेसाठी काही लाचखोर पोलीस, संबंधित विभागाचे अधिकारी आणि गुंडांनाही हाताशी ठेवले आहे. स्वत:वरची कारवाई टाळण्यासाठी तो उलट्या बोंबा मारून उलटसुलट आरोपही लावतो. त्यामुळे त्याच्याकडे कुणी फिरकत नाही.-----कारवाईपूर्वीच मिळते टिपकारवाई होण्यापूर्वीच त्याला अनेकदा टिप मिळते. गुरुवारीसुद्धा असेच झाले. पोलिसांचे पथक पोहोचण्यापूर्वीच अल्ताफने त्याचे ट्रक सुरक्षित ठिकाणी हलविले.