हायटेक अड्डे सुरू : पोलिसांच्या डोळ्यात धूळफेकनागपूर : आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे (वर्ल्ड कप टी-२०) सामने सुुरू व्हायला दोन आठवड्यांचा अवधी बाकी आहे. मात्र, नागपुरात आतापासूनच अनेक ठिकाणी हायटेक अड्डे सुरू करून आशिया चषकाच्या निमित्ताने कोट्यवधींची खायवाडी सुरू केली आहे. खामल्यातील बुकींच्या एका टोळीने गेल्या आठ दिवसात ५ कोटींची खायवाडी केल्याची जोरदार चर्चा संबंधित वर्तुळात आहे. याच बुकीच्या टोळीने गेल्या आठवड्यात एका बुकीच्या अड्ड्याची टीप देऊन पोलिसांकडून कारवाई करवून घेतली होती, हे विशेष !८ मार्चपासून टी-२० वर्ल्डकपचा संग्राम सुरू होणार आहे. नागपुरातूनच सलामीची लढत सुरू होणार असल्याने बुकींनी जोरदार तयारी केली आहे. सध्या आशिया चषक, टी -२० चे सामने सुरू आहे. नागपर हे देशविदेशातील बुकींचे केंद्रस्थान आहे. येथील बुकी थेट दुबई, बँकाँक, गोव्यात उतारी करतात. त्यामुळे क्रिकेटचे सामने जगात कुठेही खेळले जात असले तरी नागपुरातील बुकी एका सामन्यावर कोट्यवधींची खायवाडी करतात. गेल्या काही दिवसात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घेतलेल्या कणखर भूमिकेमुळे शहरातील अनेक बुकींनी आपले अड्डे नागपूरच्या सीमेबाहेर सुरू केले. मात्र, काही भ्रष्ट कर्मचारी अन् अधिकाऱ्यांना हाताशी धरून शहरातील काही बुकी नागपुरातच बसून कोट्यवधींची खायवाडी करीत आहेत. सध्या बुकींनी प्रतापनगर, नरेंद्रनगरसारख्या पॉश वस्तीत हायटेक अड्डे सुरू केले आहेत. हे सर्व अड्डे खामला आणि जरीपटक्यातील बुकी संचालित करीत आहेत. टोपण नावाने ओळखले जाणारे, अज्जू चेत्ता, सोनू जय, आरजीबी, नानू , धिन्नी या टोळीने या हायटेक अड्ड्यावरून कोट्यवधींचा व्यवहार सुरू केला असून, पोलीस ठाण्यातील काही पोलिसांना हाताशी धरून ते रोज करोडोंची उलाढाल करीत आहेत. नुकतीच बुकीच्या अड्ड्यावर पोलिसांनी कारवाई केल्यामुळे प्रतापनगर परिसरात ठिकठिकाणी हायटेक अड्डे थाटल्याची माहिती आहे. प्रतापनगर आणि गुन्हेशाखेतील काही भ्रष्ट कर्मचाऱ्यांची साथ असल्यामुळे बुकींची ही टोळी एका सामन्यावर बिनबोभाट कोट्यवधींची लगवाडी, खायवाडी करीत असल्याचे समजते. गेल्या आठ दिवसात चार कोटींची खायवाडी केल्याची खळबळजनक माहिती उघड झाली आहे.विशेष म्हणजे, शुक्रवारी मध्यरात्री गुन्हेशाखेच्या पथकाने नरेंद्रनगरातील कुख्यात अजय राऊतच्या अड्ड्यावर धाड घातली. यावेळी तेथे आनंद बोंदरे, प्रमोद मनोहर भोजापुरे (रा. नंदनवन) आणि सुरेश नत्थूजी तुमडाम (रा. पिपळा, हुडकेश्वर) दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड क्रिकेट सामन्यावर खायवाडी करताना आढळले. पोलिसांनी त्यांना मोबाईल, रेकॉर्डर आणि रोख रकमेसह ताब्यात घेतले होते. तत्पूर्वी प्रतापनगर पोलिसांनी खामल्यातील सिंदी कॉलनीतील क्रिकेट सट्ट्याच्या अड्ड्यावर छापा मारून संतोष तोतवाणी, कमल कुकरेजा, हेमंत मुलियानी आणि अमोल गंगवानीला अटक केली होती. असे असूनही काही पोलीस हाताशी असल्यामुळे खामल्यातील बुकींच्या टोळीने गेल्या आठ दिवसात ५ ते ७ कोटींची खायवाडी केल्याची जोरदार चर्चा आहे.(प्रतिनिधी)
बुकीच्या टोळीची कोट्यवधींची उलाढाल
By admin | Published: February 28, 2016 3:17 AM