नरेश डोंगरे!
नागपूर : पाहिजे तशी कडक तपासणी होत नसल्याने, रेल्वेतून नियमित कोट्यवधी रुपयांची गोल्ड तस्करी केली जात असल्याचे सांगितले जात आहे. चुकून एखाद वेळी सोने चोरीला गेले किंवा कुणी पळविले, तर तेवढ्या काही दिवसांसाठी रेल्वेतून सोन्याची बिनबोभाट वाहतूक केली जात असल्याचा मुद्दा अधोरेखित होतो आणि नंतर पुन्हा जैसे थे सर्व सुरू होते.
विविध विमानतळांवर सुरक्षेच्या कडक उपाययोजना असल्यामुळे आणि सामानाची सूक्ष्म तपासणी होते. त्यामुळे हवाईमार्गे सोने तस्करी करण्याला बऱ्यापैकी आळा बसला आहे. नियमित सोने तस्करी करणारे आता विमानतळाकडे जाण्यास कचरतात. लांब अंतरावर खासगी वाहनाने तस्करी करण्याचे अनेक धोके असतात. जागोजागी पोलिसांची नाकेबंदी असते. त्यामुळे एखाद ठिकाणी पकडले जाऊ शकतो, अशी भीती तस्करांच्या मनात असते. त्यामुळे त्यांना तस्करीसाठी रेल्वेगाडी सर्वात चांगली आणि सुविधाजनक वाटते. धावत्या रेल्वेत प्रवाशांची बॅग तपासली जात नाही. रेल्वे स्थानकावरही कडक आणि सूक्ष्म तपासणी होत नाही. त्यामुळे रेल्वेतून नियमित कोट्यवधींच्या सोन्याची बिनबोभाट तस्करी केली जाते. विशेष म्हणजे, या तस्करांवर प्रतिस्पर्धी टोळीची नजर असते. त्यामुळे टिप देऊन मध्येच सोने उडविले जाते. अशा वेळी प्रवासादरम्यान सोने चोरीला गेल्याची तक्रार दिली जाते. त्यामुळे संबंधित वर्तुळात काही दिवसांसाठी सोने तस्करीचा मुद्दा चर्चेला येतो, नंतर परत जैसे थे सुरू होते.
पंजाब, दिल्ली, हावडा ते साबरमती नेटवर्क
सोने तस्करीचे नेटवर्क पंजाब, दिल्ली आणि हावडा येथून चालते. अमृतसर, लुधियानामधूनही नियमित मोठ्या प्रमाणावर सोन्याची तस्करी केली जाते. पंजाब, दिल्लीतून रेल्वेमार्गे भोपाळ, ईटारसी आणि इकडे नागपुरात सोने आणले जाते. या दोन्ही मार्गांवरून नंतर ते गुजरातसह विविध प्रांतात पोहोचते, अशी खास सूत्रांची माहिती आहे. जळगांवमध्ये गोल्ड तस्करीचे मोठे नेटवर्क आहे. या सर्व प्रकाराकडे रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दलाकडून डोळेझाक केली जात असल्याचेही बोलले जाते.
कनेक्टिंग पीपल्स सहभागी
कोट्यवधींच्या सोने तस्करीत सहभागी असणाऱ्या तस्करांसोबत रेल्वेशी संबंधित काही मंडळीची हातमिळवणी असल्याचीही चर्चा आहे. यापूर्वी नागपूर, दिल्ली, पश्चिम बंगाल आणि गुजरात मार्गावर रेल्वेत मोठ्या रकमेच्या सोनेचोरीच्या घटना घडल्या आहेत, तर तीन दिवसांपूर्वी सूरत (गुजरात)मध्ये सागर रेल्वे स्थानकावर रेल्वेगार्ड म्हणून नोकरीला असलेल्या सुधीर सेंगर आणि त्याच्या साथीदाराला एक किलो सोने आणि ६४ लाख रुपयांसह अटक करण्यात आली. यामुळे रेल्वेतून सोन्याची मोठ्या प्रमाणात आणि नियमित तस्करी होत असल्याच्या आणि तस्करीत कनेक्टिंग पीपल्स सहभागी असल्याच्या वृत्ताला बळ मिळाले आहे.
----