सुमेध वाघमारे
नागपूर : पूर्वी एक्स-रे फिल्म डेव्हलप करण्यासाठी वापरले जाणारे ‘हायपोसोलूशन’ व निकामी ‘एक्स-रे’ फिल्मधून चांदीची पुनर्प्राप्ती होत असल्याने याला मोठी किंमत मिळते. परंतु, राज्यातील १२ कामगार विमा रुग्णालयात २०१३ पासून या साहित्याची विक्रीच झाली नसल्याने लाखो रुपयांच्या या ‘चांदी’ची माती होत आहे.
कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्यसेवा देण्यासाठी महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटीची राज्यात १२ रुग्णालये (एमएचईएसआयएस) आहेत. प्रत्येक रुग्णालयावर जवळपास तीन लाखांवर कामगार जुळले आहेत. त्यांचे कुटुंब धरून ही संख्या १२ लाखांवर जाते. या सर्वांच्या आरोग्याची जबाबदारी या रुग्णालयांवर आहे. यासाठी कामगारांच्या वेतनातून दरवर्षाला कोट्यवधी रुपयांची कपात केली जाते. परंतु, रुग्णालयात रुग्णसेवेच्या नावाने तोंडाला पाने पुसण्याचे काम सुरू आहे. दुसरीकडे रुग्णालयातील मोडकळीस आलेल्या साहित्याला भंगारात काढण्यापासून ते निकामी हायपोसोल्यूशन व एक्स-रे फिल्मची विक्री ठप्प पडली आहे. यातून मिळणाऱ्या लाखो रुपयांच्या महसूलवर पाणी फेरले आहे.
-२०१३ पासून निकामी एक्स-रे फिल्मची विक्रीच नाही
राज्यातील सर्व कामगार रुग्णालयातील निकामी हायपोसोल्यूशन व एक्स-रे फिल्मची विक्री ई-निविदामार्फत केंद्रीय पद्धतीने करण्याचा नियम आहे. परंतु, २०१३ पासून ही निविदा निघालीच नाही. यामुळे सर्वच रुग्णालयात तब्बल नऊ वर्षांपासून हे साहित्य पडून आहेत. परिणामी, कंटनेरला रासायनिक प्रक्रिया होऊन हायपोसोल्यूशनला गळती लागली आहे, तर एक्स-रे फिल्म खराब झाल्या आहेत.
- विकेंद्रीकरणाला मंजुरी तरी प्रक्रिया थंड बस्त्यात
निकामी हायपोसोल्यूशन व एक्स-रे फिल्मच्या विक्री केंद्रीय पद्धतीला वेळ लागत असल्याने व साहित्य खराब होत असल्याच्या तक्रारी वाढल्याने जुलै २०२२ रोजी कामगार विमा सोसायटी संचालकांना जाग आली. त्यांनी या केंद्रीय पद्धतीला फाटा देत विकेंद्रीकरण म्हणजे रुग्णालयीन स्तरावर विक्री प्रक्रिया राबविण्याला मंजुरी दिली. परंतु, आता चार महिन्यांचा कालावधी होऊन अनेक रुग्णालयांत विक्री प्रक्रिया थंड बस्त्यात पडली आहे. काही रुग्णालयात हे साहित्य मातीमोल झाल्याने कोणी विकत घेण्यासही पुढे येत नसल्याची माहिती आहे.