लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशातील कोट्यवधी लोक बौद्ध धम्माच्या वाटेवर आहेत. त्यासाठी २०२५ साली दिल्लीतील रामलीला मैदानावर धम्मदीक्षेचा भव्य कार्यक्रम होणार असून त्यात कोट्यवधी लोक बौद्ध धम्माची दीक्षा घेतील, अशी माहिती भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
एका कार्यक्रमासाठी ते नागपुरात आले असता रविभवन येथे पत्रकारांशी बोलत होते. भीमराव आंबेडकर यांनी सांगितले की, एससी, एसटी, ओबीसीसह एकूणच बहुजन समाजाचा मूळ धर्म बौद्ध धम्म आहे. यावर आता विविध समाजघटक उघडपणे चर्चाही करू लागले आहेत. आपल्या मूळ धम्मात परतण्याची लोकांची इच्छा बळावत चालली आहे. मागील काही वर्षातील देशातील परिस्थितीही याला कारणीभूत आहे. देशातील विविध समाज बौद्ध धम्मात परत येऊ इच्छित आहेत. भारतीय बौद्ध महासभा देशभरात फिरून जनजागृतीचे कार्य करीत आहे. परंतु हे करीत असताना कुठलाही द्वेष, टीका केली जात नाही. केवळ बुद्धाचे तत्त्वज्ञान समजावून सांगितले जाते. २०२५ सालचे नियोजन आम्ही केले आहे. त्यावर्षी कित्येक कोटी लोक बौद्ध धम्माची दीक्षा घेतील. मूळ कार्यक्रम दिल्लीत होईल. त्यानंतर देशातील प्रमुख शहरांमध्येही धम्मदीक्षेचे कार्यक्रम होतील.
यासाठी ऑनलाईन बुकिंग केली जात आहे. कोणता धर्म स्वीकारावा, हा व्यक्तिगत प्रश्न आहे, यात सरकारचा हस्तक्षेप नको. त्यामुळे काही राज्यांनी धर्मांतरणाचा केलेला कायदा हा मुळातच योग्य नाही, असेही भीमराव आंबेडकर म्हणाले.
यासोबतच भारतीय बौद्ध महासभेने काही कार्यक्रम हाती घेतले आहेत. त्यात बौद्ध वारसांचे जतन करणे, समाजातील तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणे, यासाठी त्यांना व्यवसायाकडे वळविणे आणि बुद्धविहारांमध्ये समन्वय ठेवणे ही कामे सुरू आहेत.
- समता सैनिक दलाचा एकजुटीचा प्रयत्न
सध्याची परिस्थिती अतिशय भयावह आहे. समाजातील तरुणांना रोजगार नाही. अशा परिस्थितीत समता सैनिक दल ही तरुणांची एक महत्त्वाची संघटना आहे. परंतु तीसुद्धा विभागली आहे. तेव्हा ही संघटना एकजूट राहून काम करण्याची गरज आहे. उत्तर भारतात असा प्रयत्न सुरू झाला असून आपण महाराष्ट्रासह देशभरात त्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही भीमराव आंबेडकर यांनी सांगितले.