लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गोरगरीब, कष्टकरी व्यक्तींना वर्षाला २५ टक्के व्याजदर देण्याचे आमिष दाखवून एका दाम्पत्याने त्यांचे गुंतवणुकीच्या नावाआड लाखो रुपये जमा केले आणि ही रक्कम घेऊन आरोपी दाम्पत्याने पलायन केले. किरण गणेश ठाकूर (वय ४०) आणि गणेश प्रतापसिंग ठाकूर (वय ४८), अशी आरोपी दाम्पत्याची नावे आहेत. यशोधरानगर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यातील प्राथमिक तक्रारीनुसार, या दोघांनी पावणेदोनशे लोकांचे ५० लाख रुपये हडपल्याचे पोलीस सांगतात.बम्लेश्वरीनगरात आरोपी ठाकूर दाम्पत्याने २०१३ मध्ये शांताबाई बहुउद्देशीय ग्रामीण विकास संस्था स्थापन केली. या संस्थेचे अध्यक्षपद अर्थातच किरण आणि सचिवपद तिचा पती गणेश ठाकूर याने आपल्याकडे ठेवून घेतले. यशोधरानगर, पिवळी नदीजवळ असलेल्या माँ बम्लेश्वरीनगरात कष्टकरी, गोरगरीब, छोटे दुकानदार, हातठेले चालविणारे तसेच मजुरांची संख्या जास्त आहे. ऐनवेळी कोणते काम पडल्यास मोठी आर्थिक रक्कम शिल्लक राहावी म्हणून आरोपी ठाकूर दाम्पत्याने त्यांना आर्थिक गुंतवणुकीचे महत्त्व समजावून सांगितले. ५०, १०० रुपयांपासून दैनिक बचत ते मासिक ५०० रुपयांपासून त्यांना आपल्या संस्थेत रक्कम जमा करण्यास भाग पाडले. रक्कम जमा करावी म्हणून त्यांना वर्षाला २५ टक्के व्याजाचे आमिष दाखवले. त्यामुळे अनेक गोरगरिबांनी आपल्या मुलाबाळांचे शिक्षण आणि संभाव्य कामांच्या पूर्ततेसाठी आरोपी ठाकूर दाम्पत्याकडे वर्षाला हजारो रुपये जमा केले. भिलगाव शिवनगर ग्रामपंचायतसमोर राहणाऱ्या सिंधू बबन पवार (वय ५२) यांनीही १ मे २०१३ ते ३० सप्टेंबर २०१५ या कालावधीत ९६ हजार रुपये गुंतविले. त्यांना तसेच अन्य गुंतवणूकदारांना ठरवून दिलेली मुदत संपल्यानंतर ते आपली रक्कम परत मागू लागले असता, आरोपी ठाकूर दाम्पत्य आणि त्यांचे दलाल वेगवेगळे कारण सांगून, नंतर नोटाबंदी आणि त्यानंतर आर्थिक मंदीचे कारण सांगून आरोपी दाम्पत्य गुंतवणूकदारांना टाळत होते. तगादा लावणाऱ्यांना धमकावत होते. ते रक्कम परत करणार नाही, हे ध्यानात आल्याने सिंधू पवार आणि इतरांनी यशोधरानगर ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी प्रकरण चौकशीत ठेवले. दरम्यान, पोलिसांकडे तक्रार झाल्याचे कळताच आरोपी ठाकूर दाम्पत्याने यशोधरानगरातून पलायन केले.पोलिसांनी याप्रकरणी आरोपी ठाकूर दाम्पत्य तसेच त्यांच्या साथीदाराविरुद्ध ४९ लाख ५१,२०० रुपये हडपल्याचा गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.पोलिसांची उदासिनता!गरीब, कष्टकरी नागरिकांनी आपल्या पोटाला पीळ देऊन आरोपी ठाकूर दाम्पत्याकडे आपली रक्कम जमा केली. त्यांच्या रकमेवर आरोपी ठाकूर गब्बर बनला. पैसे मागायला येणाºयाला तो नोटाबंदी, आर्थिक मंदीचे कारण सांगत होता. दुसरीकडे स्वत: ऐशोआरामाचे जीवन जगत होता. पोलिसांनी त्याला वेळीच ताब्यात घेतले असते तर त्याला पळून जाण्याची संधी मिळाली नसती, असे तक्रारदार पीडितांचे मत आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेण्यास सुरुवातीपासूनच उदासिनता दाखविल्याचाही आरोप आहे.
गुंतवणूकदारांचे लाखो रुपये हडपले : बहुउद्देशीय संस्थेच्या आरोपी दाम्पत्याचे पलायन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 12:11 AM
गोरगरीब, कष्टकरी व्यक्तींना वर्षाला २५ टक्के व्याजदर देण्याचे आमिष दाखवून एका दाम्पत्याने त्यांचे गुंतवणुकीच्या नावाआड लाखो रुपये जमा केले आणि ही रक्कम घेऊन आरोपी दाम्पत्याने पलायन केले.
ठळक मुद्देयशोधरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल