नागपूर : आॅल इंडिया मजलीस-ए-इत्तेहादूल मुस्लीम(एमआयएम) समाजात फूट पाडण्याचे राजकारण करीत आहे. तेच मुस्लीम समाजाचे शत्रू असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अल्पसंख्यांक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. सय्यद जलालुद्दीन यांनी बुधवारी केला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अल्पसंख्यांक विभागाच्या विदर्भस्तरीय संमेलनानिमित्त रविभवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. प्रदेश सचिव डॉ. सय्यद बुखारी, आमदार प्रकाश गजभिये व ख्वाजा बेग मिर्झा ,अल्पसंख्यांक विभागाचे राष्ट्रीय महासचिव दाऊ द भाई शेख आदी उपस्थित होते.आघाडी सरकारने मुस्लीम समाजाला ५ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. परंतु राज्यात सत्ता परिवर्तन झाले. आरक्षण कायम राहण्यासाठी युती सरकारने प्रयत्न केले नाही. हे सरकार संधीसाधू आहे. मुस्लीम समाजाला आरक्षण लागू व्हावे, यासाठी २५ लाख लोकांच्या सह्या घेण्याची मोहीम राबवित आहे. तसेच सरकारला लाखो पत्र पाठवून आरक्षणाची मागणी करू, त्यानंतरही राज्य सरकारने निर्णय न घेतल्यास विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान अल्पसंख्यांक विभागातर्फे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला.आरक्षण आंदोलनाला व्यापक स्वरूप देण्यासाठी राज्यात सर्व विभागात अल्पसंख्यांक विभागाचे संमेलन आयोजित केले आहे. सरकारतर्फे मुस्लीम समाजासाठी विविध योजना राबविण्यात याव्या, रोजगार व शिक्षण क्षेत्रात मुस्लीम समाजाला वाटा मिळावा. तसेच सच्चर समिती व रंगनाथन मिश्रा समितीच्या शिफारशी लागू करण्यात याव्या. यासाठी आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला. पत्रकार परिषदेनंतर अल्पसंख्यांक विभागाचे विदर्भस्तरीय संमेलन घेण्यात आले. (प्रतिनिधी)
एमआयएम मुस्लिमांचा शत्रू
By admin | Published: May 07, 2015 2:26 AM