वसीम कुरैशी।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भूवैज्ञानिकांकडून विविध क्षेत्रांतून गोळा करण्यात आलेल्या खनिज पदार्थांच्या नमुन्यांचे परीक्षण करण्यासाठी साधारणत: १० दिवसांचा कालावधी लागतो. मात्र आता हे काम काही दिवस नाही तर अवघ्या काही मिनिटांत होऊ शकणार आहे. ‘भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण’मध्ये नेदरलँड येथून एक अत्याधुनिक यंत्र आयात करण्यात आले आहे. या यंत्रामुळे नमुन्यात कोणकोणते खनिज पदार्थ आहे व किती प्रमाणात आहे, याची माहिती अवघ्या १५ मिनिटांत कळू शकणार आहे.भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणच्या प्रयोगशाळेत याला स्थापित करण्यात आले आहे. अगोदर शास्त्रोक्त किंवा पारंपरिक पद्धतीत आम्ल, क्षार इत्यादींचा उपयोग करून मिश्रण तयार केले जायचे व त्यानंतर नमुन्यांतून वेगवेगळ्या खनिजांची माहिती काढली जायची. परीक्षणपूर्व प्रक्रियेतच सात ते आठ दिवस लागायचे. त्यानंतर प्रत्यक्ष परीक्षण दोन दिवस व्हायचे. या मिश्रणातून मिळालेल्या पदार्थांना जुन्या यंत्रात टाकून परीक्षण केले जायचे. रसायनांच्या मिश्रणामुळे खनिज पदार्थ खराब होण्याचा धोका होता.मात्र आता नवीन यंत्र ‘एक्सआरएफ’मध्ये (एक्स-रे फ्लोरेसेन्स स्पेक्टोमीटर) नमुन्यांना अर्धा तासाच्या प्रक्रियेत ‘टॅबलेट’च्या रूपात थेट यंत्रात टाकले जाते. यानंतर १५ मिनिटांत ‘मेजर’, ‘मायनर’ आणि ‘ट्रेस’ या तिन्ही प्रकारच्या घटकांची एकत्रित माहिती समोर येते. एका ‘क्लिक’वर यांची टक्केवारी तसेच ‘पीपीएम’ पातळीपर्यंतची माहिती मिळते.प्रयोगशाळेतील वरिष्ठ ‘केमिस्ट’ नितीन नागमोते व अनुराग यांनी सांगितले की, ‘एक्सआरएफ’मुळे जास्त ‘आऊटपूट’ मिळत आहे. अगोदर एका महिन्यात जवळपास २५ नमुन्यांची तपासणी व्हायची. मात्र आता या यंत्राच्या माध्यमातून एका महिन्यात ४०० ते ५०० नमुन्यांचे परीक्षण करणे शक्य आहे. हे पूर्णत: ‘आॅटोमॅटिक’ यंत्र आहे. प्रयोगशाळेत यासोबतच ‘आयसीपीएमएस’, ‘एएएस’, ‘जीटीए’, ‘फियास’, ‘आयएसई’सारखे मोठे यंत्रदेखील उपलब्ध असल्याची माहिती सहायक रसायन तज्ज्ञ कुमार रॉबिन यांनी दिली.
अवघ्या १५ मिनिटात खनिज नमुन्यांचे परीक्षण शक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2019 11:18 AM
‘भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण’मध्ये नेदरलँड येथून एक अत्याधुनिक यंत्र आयात करण्यात आले आहे. या यंत्रामुळे नमुन्यात कोणकोणते खनिज पदार्थ आहे व किती प्रमाणात आहे, याची माहिती अवघ्या १५ मिनिटांत कळू शकणार आहे.
ठळक मुद्दे‘जीएसआय’च्या प्रयोगशाळेत लावण्यात आले अत्याधुनिक यंत्र