लोकमत न्यूज नेटवर्क
कोलकाता : पश्चिम बंगालच्या निवडणुकांसाठी सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने बहुप्रतिक्षित जाहीरनामा जारी केला आहे. सत्तेवर आल्यास राज्यातील प्रत्येक कुटुंबाला किमान भत्ता देण्यात येईल. तसेच विद्यार्थ्यांना क्रेडिट कार्ड व विविध समाजांचा ओबीसीमध्ये समावेश करण्यासाठी टास्कफोर्सची स्थापना असे दावे यात करण्यात आले आहेत.
तृणमूलच्या अध्यक्ष व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जाहीरनामा घोषित केला. बंगालमध्ये खुल्या प्रवर्गातील कुटुंबांसाठी वार्षिक सहा हजार तर मागासवर्गीय समाजातील कुटुंबांसाठी वार्षिक १२ हजार रुपयांचा भत्ता सुनिश्चित करण्यात येईल. कुटुंबातील महिलांच्या बँक खात्यावर ही रक्कम जमा होईल. शिवाय उच्च शिक्षण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना १० लाख रुपये खर्चाची मर्यादा असलेले क्रेडिट कार्ड उपलब्ध करून देण्यात येईल व त्यावर केवळ चार टक्के व्याजदर असेल, असे जाहीरनाम्यात स्पष्ट करण्यात आले आहे. तृणमूलच्या शासनकाळात गरिबीचे प्रमाण ४० टक्क्यांनी कमी झाले आहे. हा विकासाभिमुख जाहीरनामा असून पुढील वर्षभरात लाखो रोजगारांची निर्मिती होईल, असा दावा बॅनर्जी यांनी केला.
जाहीरनाम्यातील महत्त्वाचे मुद्दे
- घरांपर्यंत रेशनची मोफत डिलिव्हरी सुरू राहणार
- वर्षभरात पाच लाख रोजगार निर्माण करणार
- शेतकऱ्यांचे दर वर्षी १० हजार रुपयांची आर्थिक मदत
- कुटुंबातील महिलांच्या खात्यावर दर महिन्याला किमान रक्कम जमा होणार
- राज्यात १० लाख एमएसएमई (सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योग) स्थापित करणार
- पाच वर्षांत २ हजार मोठे औद्योगिक प्रकल्प सुरू करणार
- महिष्य, तिली, तमूल, साहस यासारख्या समुदायांना ओबीसीचा दर्जा देण्यासाठी टास्क फोर्स गठीत करणार
- महतो समाजाला अनुसूचित जमातींचा दर्जा देण्यासाठी प्रयत्न करणार
- उत्तर बंगालमधील तेराई व दूआर भागासाठी विशेष विकास मंडळ स्थापन करणार
- विधवांना एक हजार रुपये मासिक पेन्शन