नागपूर : पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते आणि बचत योजनांची सुविधा लोकप्रिय आहे. सध्या पोस्ट ऑफिसने बचत खात्याच्या नियमांमध्ये बदल केला आहे. बचत खात्यात ११ डिसेंबरपासून ५०० रुपये किमान बॅलेन्स असणे आवश्यक झाले आहे. पूर्वी शून्य बॅलेन्समध्ये बचत खाते उघडण्याची सुविधा होती, हे विशेष.
५०० रुपये किमान बॅलेन्स नसलेल्या खातेदारांना आता खात्यात ११ डिसेंबरपर्यंत ५०० रुपये जमा करावे लागतील. अशा प्रकारची नोटीस पोस्ट ऑफिसच्या सर्व कार्यालयांमध्ये लावण्यात आली असून कर्मचारी खातेदारांना या संदर्भात माहिती देत आहेत. या नियमाचे पालन न करणाऱ्या ग्राहकाला मेंटेनन्स चार्ज द्यावा लागेल. सध्याच्या नियमानुसार चालू वित्तीय वर्षांत ग्राहकाने ५०० रुपयांचा किमान बॅलेन्स कायम न ठेवल्यास वित्तीय वर्षाच्या अखेरच्या दिवशी खात्यातून १०० रुपये मेंटेनन्स चार्ज कापण्यात येणार आहे. चार्ज कापल्यानंतर खात्यातील बॅलेन्स शून्य होत असेल तर खाते आपोआप बंद होईल. त्यामुळे खात्यात ५०० रुपये असणे आवश्यक झाले आहे. याशिवाय बचत खाते सुरू ठेवण्यासाठी तीन वित्तीय वर्षांत किमान एक व्यवहार करणे बंधनकारक आहे. या बचत खात्यावर वार्षिक ४ टक्के दराने व्याज मिळते.