लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : २०१८-१९ मध्ये जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागाने जलस्रोत बळकटीकरणाची कामे केली होती. ही कामे खनिज प्रतिष्ठानाच्या निधीतून करण्यात आली होती. त्यासाठी २५ कोटींच्या निधीच्या खर्चाला मान्यताही प्रतिष्ठानने दिली होती. पण कामे पूर्ण झाल्यानंतर प्रतिष्ठानने १५ कोटी रुपयांचा निधी ‘कोरोना’चे कारण दाखवित थांबविला आहे. मार्च २०२० नंतर कोरोनाचा उद्रेक झाला. मग २०१८-१९ चा निधी का थांबविला, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. जिल्हा परिषद या निधीसाठी वारंवार पत्रव्यवहार करीत आहे. त्यामुळे नवीन कामालासुद्धा विलंब होत आहे.
कामे पूर्ण झाली असल्याने देयके मिळावी म्हणून कंत्राटदार या लघुसिंचन विभागाच्या चकरा मारत आहे़ लघु सिंचन विभाग कंत्राटदारांना आपला पाठपुरावा संबंधित विभागाकडे सुरू असल्याचे वारंवार सांगत आहे़ २०१८-१९ या वर्षातील हा निधी आहे़ पाझर तलाव बळकटीकरण, कोल्हापुरी बंधारा दुरुस्ती, नाला खोलीकरण, अशी कामे या निधीतून करण्यात आली़ त्यातील ४४ कामे पूर्ण झाली आहे़ तर ३५ कामे अंतिम टप्प्यात आहे़ कामांचे गुणवत्तापूर्ण मूल्यांकन होऊन देयकांसाठीचे प्रस्ताव कंत्राटदारांनी लघु सिंचन विभागाकडे सादर केले़ मात्र, निधीअभावी पुढे कामे सुरू करायची की नाही, हा प्रश्न कंत्राटदारांसमोर आहे़ खनिज प्रतिष्ठान प्रशासनाने कोरोनामुळे हा निधी खर्च देण्यास तात्पुरती स्थगिती असल्याचे कारण दिले आहे़ त्यामुळे जलस्रोत बळकटीकरणाच्या कामे पूर्ण होऊ शकली नाही़ या निधीचा व कोरोनाचा कुठलाही संबंध नसताना निधी थांबविण्याचे प्रतिष्ठानचे कारण काय? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
कोरोनामुळे निधी थांबविला होता. आमच्याकडे तक्रारीही आल्या होत्या. आम्ही जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. पाठपुरावासुद्धा केला. ८० टक्के कामे पूर्ण झाली आहेत. जसजसे कंत्राटदारांकडून बिले येतात, तसतसे निधीचे वितरण सुरू केले आहे.
रश्मी बर्वे, अध्यक्ष, जि.प. नागपूर