नागपूर : राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हे ७ व ८ फेब्रुवारी अशा दोन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. या दरम्यान, ते नागपूर जिल्ह्यातील औष्णिक वीजकेंद्राद्वारे होणाऱ्या प्रदूषणाची पाहणी व फ्लाय अॅशच्या प्रश्नावर तसेच, चंद्रपूरमधील तलावाबाबत पर्यटन, पर्यावरण व वातावरणीय बदलाचा आढावा आढावा घेणार आहेत.
सोमवारी दुपारी २ वाजता आदित्य ठाकरे हे विषेश विमानाने नागपुरला आल्यानंतर तेथून ते कारने चंद्रपूरकडे रवाना होतील. चंद्रपुरातील रामाळा तलाव, बगड खिडकी, चांदा किल्ला स्वच्छता अभियानाची पाहणी करतील. जिल्ह्यातील पर्टनाबाबत आढावा बैठक घेतल्यानंतर ते रात्री नागपूरला परततील.
नागपूर जिल्ह्यातील कोराडी व खापरखेडा या औष्णिक वीज प्रकल्पाच्या प्रदूषणाचा मुद्दा गंभीर बनला आहे. मध्यंतरी हा मुद्दा बराच गाजला होता. आदित्य ठाकरे यांनी याची दखल घेतली आहे. आदित्य ठाकरे मंगळवारी सकाळी ते या वीज प्रकल्पाचा आढावा घेतील व या परीसराला प्रदूषणापासून दिलासा देण्यासाठी पर्यावरण व उर्जा विभागाकडून संयुक्त योजना कार्यान्वित करण्याबाबत विचार ते बोलण्याची शक्यता आहे.
दरम्यान, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी)च्या नाेटीसनंतर शुक्रवारी (४ फेब्रुवारी) केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाच्या पथकाने काेराडी व खापरखेडा औष्णिक वीजकेंद्राद्वारे हाेणाऱ्या प्रदूषणाची पाहणी केली होती. वीजकेंद्रातून निघणारी पाईपलाईन जागाेजागी फुटल्याने नदी, तलाव व शेतात पसरलेला राखेचा प्रवाह पाहून त्यांनाही धक्का बसला. मंत्रालयाच्या पथकाने हा सर्व प्रकार ताबडताेब थांबविण्याचे कडक निर्देश साेबत असलेल्या महाजेनकाेच्या अधिकाऱ्यांना दिले.