नागपूर: राजधानी मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा वीजपुरवठा १२ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता खंडित झाला होता. त्यानंतर अडीच ते तीन तासांनी वीज पुरवढा सुरळीत व्हायला सुरुवात झाली. मात्र त्यादिवशी मुंबई अंधारात गेली, तो घातपातच होता, असा खुलासा राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केला होता.
मुंबई अंधारात गेली होती, मुंबईतील वीजपुरवठा अचानक खंडीत झाला होता. त्यावेळी, मी घातपात असल्याचं सूतोवात मी केलं होतं. पण, अनेकांनी मला वेड्यात काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, वस्तूस्थिती अशी आहे की, तो घातपातच होता. यासंदर्भात सायबर विभागाकडून मला संध्याकाळी ६ वाजता अहवाल देण्यात येईल.
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या ज्ञानेश्वरी बंगल्यावर हा रिपोर्ट मला मिळेल, असे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सांगितलं. वॉशिंग्टन पोस्टमध्ये जो रिपोर्ट आलाय, त्यासंदर्भातही सर्व माहिती मी तिथेच देईल,'' असेही नितीन राऊत यांनी सांगितलं आहे. मात्र नितीन राऊत यांच्या या विधानावरुन भाजपाचे प्रदेश सरचिटणीस व माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी निशाणा साधला आहे.
१२ ऑक्टोबर रोजी मुंबईत ४ तास वीज बंद होती. या प्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुख आणि उर्जामंत्री नितीन राऊत यांनी पाठ थोपटून घेण्याचा प्रकार केला. कपोलकल्पित अहवालाच्या आधारावर जनतेला मूर्ख बनविण्याचे काम केले आहे, अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.
एका आंतरराष्ट्रीय पेपरच्या आधारावर आयपीएस ऑफिसरने अहवाल तयार केला. चीनचे नाव अहवालात होते तर केंद्रीय परराष्ट्र किंवा गृहमंत्रालयाला कळविले होते का, असा सवाल उपस्थित करत अधिवेशनाच्या तोंडावर अपयश लपविण्याचे कारस्थान, असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. प्रत्यक्षात मुंबईला येणाऱ्या ४०० केव्हीच्या दोन लाईन ब्रेकडाऊन झाल्या होत्या, इतर दोन लाईनवर लोड आले, म्हणून स्पार्किंग झाले, असा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.
संबंधित लाईन सायबर अटॅकच्या पातळीचा नाही. हा घातपात नाही, अधिकाऱ्यांनी चूक केली, समन्वय ठेवला नाही. अपयश झाकण्यासाठी दोन्ही मंत्री जनतेला मूर्ख बनवत आहे, असे अशोभनीय कृत्य करणाऱ्या दोन्ही मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.