नागपूर : महामेट्रो व भारतीय रेल्वे यांच्यामधील ब्रॉडगेज मेट्रो प्रकल्पाच्या करारावर पुढच्या आठवड्यात स्वाक्षऱ्या केल्या जातील, अशी महत्त्वपूर्ण माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
वर्धा रोडस्थित आशियामध्ये सर्वांत लांब असलेल्या बहुस्तरीय मेट्रो रेल्वे पुलाची एशिया बुक ऑफ रेकॉर्डस् व इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस्मध्ये नोंद घेण्यात आली आहे. त्यानिमित्त रविवारी महामेट्रो व भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणला सन्मानित करण्यात आले. त्यावेळी गडकरी बोलत होते. महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित व महामार्ग प्राधिकरणचे प्रादेशिक अधिकारी राजीव अग्रवाल यांनी हा सन्मान स्वीकारला.
अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेला हा प्रकल्प लवकरच मार्गी लागेल. या प्रकल्पाद्वारे नागपूर शहर अकोला, चंद्रपूर, नागभीड, गोंदिया, रामटेक, छिंदवाडा व बैतुलला जोडले जाईल. हा जगातील पहिला ब्रॉडगेज मेट्रो प्रकल्प असेल. या प्रकल्पामुळे नागपूर व इतर शहरांमधील संपर्क बळकट होईल. यासंदर्भात नुकतेच रेल्वेमंत्र्यांशी बोलणे झाले. पुढील सर्व बाबी सुरळीत पार पडतील, असे गडकरी यांनी सांगितले. दरम्यान, त्यांनी सोमलवाडाला मनीषनगर आणि सीताबर्डीतील माहेश्वरी भवनला झीरो माईलशी जोडण्यासाठी दोन अंडरपासेस बांधण्याचे आवाहन महामेट्रोला केले. या प्रकल्पासाठी केंद्रीय रस्ते निधीमधून पैसे उपलब्ध करून दिले जातील, असेही ते म्हणाले.
कळमना ते वासुदेवनगरपर्यंत ट्रॉली बस
गडकरी यांनी देशातील मोठ्या शहरांमध्ये ट्रॉली बस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूर व गाझियाबाद येथे पायलट प्रकल्प अमलात आणला जाणार आहे. नागपूरमध्ये कळमना ते वासुदेवनगरपर्यंत ट्रॉली बस सुरू केली जाईल. ट्रॉली बस एलेवेटेड ट्रॅकवर धावेल. त्यासाठी महामेट्रोने विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करावा, असे गडकरी यांनी सांगितले.
महामेट्रोने सिटी बस चालवाव्यात
सिटी बस याेग्य पद्धतीने चालविल्या जात नसल्यामुळे गडकरींनी महानगरपालिकेची कानउघाडणी केली, तसेच महामेट्रोने सिटी बस सेवा स्वत:च्या ताब्यात घ्यावी, असे आवाहन केले. महामेट्रोला सिटी बस चालवायच्या नाहीत, हे माहिती आहे; परंतु महामेट्रोशिवाय दुसरा पर्याय उपलब्ध नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.