मंगेश व्यवहारे नागपूर : ‘उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामुळे मंत्रिपदे रखडलेली नाहीत. त्यांना गळ्याचा संसर्ग (थ्रोट इन्फेक्शन) झाल्यामुळे डॉक्टरांनी विश्रांती घेण्यास सांगितले होते,’ अशी स्पष्टोक्ती राष्ट्रवादी अपचे आमदार अमोल मिटकरी यांनी बुधवारी विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली.
उपमुख्यमंद्धी अजित पवार हे मंगळवारी अधिवेशनाच्या कामकाजात सहभागी झाले नव्हते. ते आमदार, कार्यकर्त्यांनादेखील भेटत नव्हते. त्यामुळे ते मंत्रिपदावरून नाराज असल्याची चर्चा होती. मात्र, बुधवारी अजित पवार सभागृहात परतले. तत्पूर्वी, त्यांनी त्यांच्या ‘विजयगड’ या शासकीय निवासस्थानी सकाळी सहा वाजतापासून कार्यकर्त्यांची भेट घेतली. या पार्श्वभूमीवर बोलताना आमदार मिटकरी म्हणाले,‘दादांना कुठलाही राजकीय आजार जखडलेला नाही. सतत कामात व्यस्त असल्यामुळे काही मानवी मर्यादा असतात. त्यांना थ्रोट इन्फेक्शन झाल्यामुळे डॉक्टरांनी विश्रांती करण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे ते नॉट रिचेबल होते. त्यांच्यामुळे मंत्रिपदेदेखील रखडलेली नाहीत.’ शशिकांत शिंदे-अजित पवार भेटीवर बोलताना ते म्हणाले,‘सत्तेबाहेर असलेल्यांपैकी अनेक जण अस्वस्थ आहेत. शशिकांत शिंदेदेखील त्यातील एक आहेत. त्यामुळे त्यांनी अजितदादांची भेट घेतली असावी. शिंदे उगाच अजितदादांची भेट घेणार नाही.’
भुजबळांची नाराजी दादा स्वत: दूर करतीलछगन भुजबळ हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांची नाराजी स्वत: अजित पवार दूर करतील. आज त्यांचा नाशिक येथे मेळावा आहे. तिथे ते त्यांची भूमिका स्पष्ट करतील, अशी अपेक्षा असल्याचे अमोल मिटकरी म्हणाले. मात्र, भुजबळांच्या काही उतावीळ कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या फोटोला जोडे मारून केलेले आंदोलन आम्ही खपवू घेणार नाही, असा इशारादेखील त्यांनी दिला.
रेशीमबागेत जाणार नाहीनव्याने आमदारकीची शपथ घेतलेले आमदार रेशीमबाग येथील स्मृती मंदिर परिसराला भेट देत असतात. तिथे त्यांना संघाच्या सेवकार्याबाबत माहिती देण्यात येते. यंदा हा वर्ग गुरुवारी होणार असल्याची माहिती असून मी जाणार नसल्याचे मिटकरी म्हणाले.