आॅनलाईन लोकमतनागपूर : जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका सहा वर्षीय बालिकेसोबत अश्लील कृत्य करणाऱ्या वडीलतुल्य इसमाला लैंगिक अपराधांपासून बाल संरक्षण कायद्याचे (पोक्सो) विशेष न्यायाधीश ओ. पी. जयस्वाल यांच्या न्यायालयाने सात वर्षे सश्रम कारावास आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.विनोद गुलाब डोंगरे (३०), असे आरोपीचे नाव आहे.प्रकरण असे की, विनोद डोंगरे याचे कुटुंब पीडित मुलीच्या शेजारीच राहायचे. पीडित मुलीचे आई-वडील नोकरी व व्यवसायानिमित्त सकाळी घराबाहेर पडून उशिरा रात्री घरी परतायचे. घरी येण्यास उशीर होत असल्याने आणि विनोद डोंगरे याच्यावर विश्वास असल्याने त्यांनी मुलीला ‘विनोद अंकल’च्या घरी खेळण्यास सांगितले होते.ही दुर्दैवी घटना २१ डिसेंबर २०१४ रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली होती. त्यावेळी ती घरी एकटीच होती. विनोदने तिच्या घरात घुसून आधी जेवण मागितले होते आणि त्यानंतर तिच्याशी अश्लील कृत्य केले होते. यापूर्वीही त्याने असा प्रकार केला होता. घटना घडत असताना शेजारी महिलेने पीडित मुलीच्या वडिलांना मोबाईलवर संपर्क करून घरी बोलावले होते. पीडित मुलीच्या वडिलांनी या नराधमास झोडपले होते. वडिलांच्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी भादंविच्या ३७६(२)आणि पोक्सोच्या कलम ८ अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली होती.महिला पोलीस उपनिरीक्षक एस. डब्ल्यू. किन्नाके यांनी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात आरोपीविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. गुन्हा सिद्ध होऊन आरोपीला भादंविच्या ३७६ (१) कलमांतर्गत सात वर्षे सश्रम कारावास, एक हजार रुपये दंड, पोक्सोच्या कलम ८ अंतर्गत तीन वर्षे सश्रम कारावास आणि एक हजार रुपये दंड, अशी शिक्षा सुनावली.न्यायालयात सरकारच्या वतीने सहायक सरकारी वकील दीपिका गवळी, आरोपीच्या वतीने अॅड. शेख शाबाहत यांनी काम पाहिले. हेड कॉन्स्टेबल सुरेश शेंडे आणि नायक पोलीस शिपाई योगेश डबले यांनी न्यायालयीन कामात सहकार्य केले.