लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर शाळेच्या आवारात तिच्यावर अत्याचार करणारा नराधम भूषण भीमराव दहाट (वय २५) याला वाडी पोलिसांनी मंगळवारी दुपारी अटक केली. सावनेर-काटोल जवळच्या मोहपा परिसरात तो दडून बसला होता. या घटनेमुळे सोमवारी दुपारपासून वाडी परिसरातील जनभावना प्रचंड तीव्र झाल्या होत्या. आरोपी दहाटच्या अटकेमुळे पोलिसांवरचे दडपण कमी झाले आहे.पीडित चिमुकली फुटाळा वस्तीतील रहिवासी आहे. तिच्या कुटुंबीयांची आर्थिक अवस्था अत्यंत कमकुवत आहे. ती केजी-१ ला शिकते. तिची आई धुणीभांड्याचे काम करते. घरात सांभाळणारे कुणी नसल्याने तिची आई तिला सोबत कामाच्या ठिकाणी नेते. रविवारी दुपारी आईने चिमुकलीला अमरावती मार्गावरील कॅम्पस जवळच्या काचीमेट परिसरातील, कोठारी ले-आऊटमध्ये एका इमारतीत नेले. स्कूल ऑफ स्कॉलरच्या परिसरात मुलीच्या आईची मैत्रीण राहते. ती नराधम भूषण दहाटची बहीण असून, शाळेत चपराशी म्हणून कार्यरत आहे. आरोपीचे वडील बाजूच्या अपार्टमेंटमध्ये चौकीदारी करतात तर, हा नराधमही सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करतो. मैत्रीण घरी नसल्याने आईने चिमुकलीला नराधम दहाटकडे सोपविले. तिला खूप भूक लागली असून, तिला मॅगी खाऊ घाल आणि माझे काम संपेपर्यंत तिच्याकडे लक्ष ठेव म्हणत मुलीची आई बाजूच्या इमारतीत कामाला निघून गेली.चिमुकलीवरच लावला आरोपदुपारी ३.३० ला नराधम भूषणने फोन करून मुलीच्या आईला परत यायला सांगितले. आपल्याला बाहेर जायचे आहे, असे तो म्हणाला. काम व्हायचे असल्याने मुलीला माझ्याकडे आणून दे, असे आईने दहाटला सांगितले. त्यानुसार, चिमुकलीला श्री रेसिडेन्सीच्या पार्किंगमध्ये सोडून नराधम दहाट पळून गेला. मुलगी अस्वस्थ वाटत असल्याने आईने तिला विचारणा केली असता, भूषण मामाने त्याच्या मोबाईलमध्ये घाणेरडा व्हिडीओ दाखवून कुकृत्य केल्याचे चिमुकलीने सांकेतिक भाषेत सांगितले. यावेळी शकुनबाई नामक एक मैत्रीणही मुलीच्या आईजवळ होती. आईने लगेच आपल्या मैत्रिणीला (आरोपीच्या बहिणीला) फोन करून तिच्या भावाने केलेल्या कुकृत्याची माहिती दिली. त्यानंतर मायलेकी घरी गेल्या.रात्री ८ च्या सुमारास मुलीच्या आईने नराधम दहाटला फोन करून चिमुकलीसोबत केलेल्या कृत्याबाबत त्याची कानउघाडणी केली. यावेळी आरोपीने मुलगी खोटी बोलत असल्याचा आरोप लावला. आईने त्याला शिव्या हासडल्याने त्याने आपला फोन बंद केला. दरम्यान, सोमवारी सकाळी अपार्टमेंटमधील महिलांना मुलीवरील अत्याचाराची व्यथा सांगितली. महिलांनी पीडित मुलीच्या आईला धीर देत पोलिसांकडे तक्रार नोंदविण्याचा सल्ला दिला. बाजूचे सामाजिक कार्यकर्तेही सोबत आले. पोलिसांनी हा गुन्हा दाखल करण्यासाठी तब्बल ७ वाजवले. दरम्यान, मुलीची आई पोलीस ठाण्यात गेल्याचे कळताच आरोपी पळून गेला.चिमुकलीवर अत्याचार करून आरोपी पळून गेल्याचे कळाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला. तो लक्षात येताच वाडी पोलिसांनी धावपळ करून मंगळवारी दुपारी २ ते ३ च्या सुमारास मोहपाजवळ नराधम दहाटला ताब्यात घेतले. त्याला बुधवारी कोर्टात हजर केले जाणार आहे.बहिणीच्या मैत्रिणीवर विखारी नजरनराधम भूषण दहाट हा विकृत आहे. पीडित मुलीची आई आणि भूषण दहाटची बहीण या दोघी मैत्रिणी आहेत. त्या बहिणींप्रमाणेच एकमेकींसोबत वागतात. त्यामुळे त्यांचे एकमेकींकडे येणे-जाणे आहे. त्यामुळे पीडित मुलीची आईदेखील भूषणला भावासारखीच समजत होती. मात्र, विकृत वृत्तीचा भूषण तिच्याकडे विखारी नजरेने बघत होता. बहीण घरी नसली आणि ती आली की तो तिच्यासोबत नको तशी सलगी करण्याचा प्रयत्न करायचा. ते लक्षात आल्यामुळे मुलीच्या आईने त्याला काही दिवसांपूर्वी खडसावले होते. तुला मी भाऊ मानते, तू अशा नजरेने यापुढे माझ्याकडे बघायचे नाही, असाही दम दिला होता.