चिचाळा : ओव्हरटेक करण्याच्या नादात झालेल्या विचित्र अपघातात तीन वाहने एकमेकांवर धडकली. त्यात दाेन जण किरकाेळ जखमी झाले. ही घटना चिचाळा (ता. भिवापूर) परिसरात गुरुवारी (दि.२७) सकाळच्या सुमारास घडली. वृत्त लिहिस्ताेवर जखमीची नावे कळू शकली नाही.
काेटगाव (ता. चिमूर) येथील प्रवीण बारेकर हा आपल्या एमएच-२९/जी-०७८२ क्रमांकाच्या सुमाेने गावातील नवरदेव व वऱ्हाडी घेऊन उमरेड तालुक्यातील सेव येथे जात हाेता. दरम्यान, चिचाळा परिसरात एमएच-३४/बीजी-९१४९ क्रमांकाचा कंटेनर पाेकलॅण्ड घेऊन भिसी येथून उमरेडकडे जात असताना मागून येणाऱ्या एमएच-४०/वाय-८१३ क्रमांकाचा ट्रक समाेरील कंटेनरला ओव्हरटेक करीत हाेता. अशातच मागून येणाऱ्या सुमाेचालक प्रवीणनेही वाहनाचा वेग वाढवत कंटेनर व ट्रकच्या मधाेमध येऊन वाहनांना ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. यात त्याचा ताबा सुटून भरधाव सुमाे समाेरच्या कंटनेरवर धडकली. यात सुमाेच्या समाेरील भागाचा चुराडा झाला. यात सुमाेतील दाेघे किरकाेळ जखमी झाले. सुदैवाने कुणालाही गंभीर दुखापत झाली नाही. लगतच्या शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत कंटेनरमध्ये शिरलेल्या सुमाेला बाहेर काढले. सुमाेची धडक इतकी जाेरदार हाेती की कंटेनरवरील पाेकलॅण्ड दाेन फुटापर्यंत हलल्याचे कंटेनरचालक अरुण नन्नावरे यांनी सांगितले.