नागपूर : शेजाऱ्याकडून २ हजार रुपये उसणे घेतल्यामुळे आई रागावली. त्यामुळे रागाच्या भरात १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलाने आजीच्या घरी जातो, असे सांगून पलायन केले. तो बुट्टीबोरीजवळील एका ढाब्यावर काम करू लागला. परंतु गुन्हे शाखेच्या अनैतीक मानवी व्यापार प्रतिबंधक पथकाने त्याचा शोध घेऊन त्यास कुटुंबीयांच्या स्वाधीन केले.
नागपूर जिल्ह्यातील खापा येथील १७ वर्षांच्या कुणालने (बदललेले नाव) शेजाºयाकडून २ हजार रुपये उसणे घेतले. त्याच्या आईला ही बाब माहिती होताच तिने कुणालला फटकारले. त्यामुळे तो १८ मे २०२४ रोजी नागपूरला सदर परिसरात राहणाºया आजीकडे आला. त्यानंतर त्याची आई उपचारासाठी नागपूरला आली. पैसे कशासाठी उसणे घेतले याची विचारना करूनही कुणालने काहीच सांगितले नाही. कुणालची आई उपचारासाठी रुग्णालयात जाताना तिने कुणालला बसस्थानकावर सोडून खापा येथे परत जाण्यास सांगितले. परंतु कुणाल रागाच्या भरात खापाला न जाता बुट्टीबोरी येथील अमृतसर ढाब्यावर गेला. तेथे तो काम करीत होता. मुलगा बेपत्ता झाल्यामुळे कुणालच्या आईने मानकापूर ठाण्यात तक्रार दिली.
मानकापूर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम ३६३ नुसार गुन्हा दाखल केला. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या अनैतीक मानवी व्यापार प्रतिबंधक पथकाने कुणालजवळ असलेल्या मोबाईलचे लोकेशन तपासले असता तो बुट्टीबोरीजवळील ढाब्यावर असल्याचे समजले. कुणालच्या मोबाईलवर संपर्क साधला असता ढाब्यावर काम करणाऱ्या व्यक्तीने कुणाल तेथे असल्याचे सांगितले. अनेतिक मानवी व्यापार प्रतिबंधक पथकाच्या पोलिस निरीक्षक ललिता तोडासे यांनी कुणालला ताब्यात घेऊन त्याचे समुपदेशन केले. त्यानंतर कुणालला मानकापूर पोलिसांकडे सोपविण्यात आले. ही कारवाई पोलिस निरीक्षक ललिता तोडासे, सहायक पोलिस निरीक्षक गजेंद्र ठाकूर, राजेंद्र अटकाडे, दिपक बिंदाने, सुनिल वाकडे, श्याम अंगुठलेवार, विलास चिंचुलकर, शरीफ शेख, ऋषिकेश डुमरे, नरेश सिंगणे, वेशाली किनेकर, अश्विनी खोडपेवार यांनी केली.