नागपूर : वर्दळीच्या वेळी अंबाझरी ले आऊटमधून मोबाईल हिसकावून पळ काढणाऱ्या अल्पवयीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक एकच्या पथकाने ही कारवाई केली. मागील काही काळापासून मोबाईल चोरीमध्ये अल्पवयीन आरोपींचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे व यामुळे पोलीस विभागाची डोकेदुखी वाढली आहे.
चिंधू सोनवाणे (३६, इंद्रप्रस्थनगर) हे १३ जुलै रोजी बजाजनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अंबाझरी ले आऊट येथील जागृती होमखाली फोनवर व्हॉट्सअप पाहत असताना अचानक दोन आरोपी मोपेडवर आले व मोबाईल हिसकावून पळ काढला. बजाजनगर पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक एककडूनदेखील समांतर तपास सुरू होता. तांत्रिक तपास व खबऱ्यांच्या नेटवर्कच्या माध्यमातून यात दोन अल्पवयीन आरोपी सहभागी असल्याची माहिती मिळाली.
पोलिसांनी सापळा रचून त्या दोघांना ताब्यात घेतले व त्यांना विचारणा केली. आरोपींनी गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून मोबाईल व दुचाकी जप्त करण्यात आली. आरोपींनी पुढील कारवाईसाठी बजाजनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले. पोलीस निरीक्षक अनिल ताकसांडे, महामुनी, दीपक ठाकरे, विनोद देशमुख, रितेश तुमडाम, सुशांत सोळंके, मनोज टेकाम, सुनीत गुजर, चंद्रशेखर भारती व रविंद्र राऊत यांच्या पथकाने ही कारवाई केली.