नागपूर : व्यसनाच्या आहारी गेलेल्या अल्पवयीन मुलांनी चोरी आणि घरफोडीचा मार्ग धरला. नंदनवन पोलिसांनी या तिघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडून चार गुन्ह्यांची उकल झाली.
चोरीच्या गुन्ह्यात पकडलेले अल्पवयीन मुले पारडी ठाण्याच्या परिसरात राहतात. त्यांच्याविरुद्ध आधीही गुन्हे दाखल आहेत. त्यांना दारू आणि व्हाईटनरच्या नशेची सवय आहे. व्यसनामुळे ते चोरी करतात. शिवनगर खरबी येथील रहिवासी मोनू अंसारी यांनी १२ जुलैला रात्री आपल्या घरासमोर दुचाकी उभी केली होती. आरोपींनी त्यांची दुचाकी चोरी केली. नंदनवन पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. पोलिसांना १५ जुलैच्या रात्री केडिके कॉलेज मार्गावर अल्पवयीन मोनू अंसारीच्या दुचाकीवर ट्रिपल सीट संशयास्पद अवस्थेत जाताना दिसले. पोलिसांनी चौकशी केली असता आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलीस ठाण्यात नेऊन चौकशी केली असता त्यांनी सत्यस्थिती सांगितली. या अल्पवयीन गुन्हेगारांकडून वाहनचोरीचे तीन आणि घरफोडीच्या एका गुन्ह्याचा खुलासा झाला आहे. ते घरफोडीत मिळालेले दागिने आणि महागडे सामान विकून दारु आणि व्हाईटनरवर खर्च करतात. खूप दिवसांपासून ते चोरीच्या गुन्ह्यात अडकलेले आहेत. घरफोडीसाठी बंद घर न मिळाल्यामुळे ते दुचाकी चोरीकडे वळले. दुचाकी विकल्या न गेल्यामुळे ते स्वत: दुचाकी वापर करीत होते. त्यांच्याकडून ९० हजारांचे साहित्य जप्त करून त्यांना बाल सुधारगृहात पाठविण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस उपायुक्त डॉ. अक्षय शिंदे, सक्करदरा विभागाचे सहायक पोलीस आयुक्त डॉ. नीलेश पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुक्तार शेख, हवालदार संदिप गंडुलवार, शिपाई विकास टोंगे, प्रवीण भगत, चंद्रशेखर कदम, स्वप्निल तांदूळकर, रुपाली भुंबर यांनी पार पाडली.
.....................