नागपूर : आवडीचे जेवण न मिळाल्यामुळे विमान प्रवासादरम्यान एक प्रवासी चांगलाच संतप्त झाला. त्याने विमानातील एअर होस्टेसला सुनावले. तिच्याशी असभ्य वर्तनही केले. हा वाद चांगलाच वाढला. सोनेगाव पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचला. शेवटी प्रवाशाने माफी मागितल्यावर प्रकरण निवळले.
बुधवारी सायंकाळी ७.३० वाजताच्या दरम्यान दिल्लीवरून रवाना झालेले विमान ६ ई ६६०१ यात संबंधित प्रवासी प्रवास करीत होता. विमानात प्रवाशांना उपलब्ध जेवण देण्यात आले. परंतु संबंधित प्रवाशाला हे जेवण पसंत पडले नाही. त्याने आपल्या आवडीच्या जेवणाची मागणी केली. यावर केबिन क्रू ने त्याला खूप समजावले.
सूत्रानुसार, प्रवासी जोरात बोलत असल्याने एअर होस्टेसने त्याला विमानात स्वतंत्रपणे जेवण तयार करणे शक्य नसल्याचे सांगितले. विमानाच्या पायलटनेही त्याला समजावले. परंतु त्या प्रवाशाचा राग शांत झाला नाही. विमान रात्री ९.३० वाजता नागपूर विमानतळावर उतरले. त्यानंतरही त्या प्रवाशाचा संताप कायम होता. प्रकरण वाढत असल्याने सोनेगाव पोलिसांना सूचना देण्यात आली. परंतु याप्रकरणी कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. विमानतळावरील सुरक्षा रक्षकांनी पुढे आले तेव्हा प्रवाशाने महिला कर्मचाऱ्याची माफी मागितली तेव्हा हे प्रकरण शांत झाले.