नागपूर : शासनाची मान्यता नसतानाही सुरू असलेल्या त्रिमुर्ती पब्लिक स्कूल बाजारगाव व सिद्धीविनायक स्कूल बुटीबोरी या शाळांना शिक्षण विभागाने अनाधिकृत ठरविले होते. या दोन्ही शाळांवर विभागाने ६६,१०,००० रुपयांचा दंड ठोठावला होता. त्याचबरोबर शाळेतील विद्यार्थ्यांचे नजिकच्या शाळेत समायोजन करण्याचे निर्देश दिले होते. परंतु शाळेने दंडही भरला नाही आणि विद्यार्थ्यांचे समायोजनही केले नाही.
पंचायत समिती नागपूरच्या गटशिक्षण अधिकारी राजश्री घोडके यांनी या शाळांना वारंवार पत्र पाठवून दंड भरण्याचे तसेच विद्यार्थ्यांच्या समायोजनाचे निर्देश दिले. परंतु शाळांची इतकी मगरुरी वाढली की, अधिकाऱ्यांच्या पत्राला केराची टोपली दाखवित शाळा अजूनही सुरू आहे.
पत्र मिळाल्यापासून तीन दिवसाचा वेळ दिला आहे. तीन दिवसात समायोजनाची कार्यवाही व दंड भरल्याची पावती सादर न केल्यास शाळेच्या विरुद्ध फौजदारी कारवाई प्रस्तावित करण्यात येईल, असा इशारा गटशिक्षणाधिकारी राजश्री घोडके यांनी दिला.