नागपूर : पत्रकारितेच्या दरम्यान एक सुक्ष्मरेखा असते तिचं भान ठेवणं गरजेच आहे. त्याच्या आसपास राहुन आपण निष्पक्षतेनं माहिती, घटनाक्रम प्रस्तुत करणं मीडियाचं कार्य आहे. यात जराही गफलत होऊन ती सुक्ष्मरेखा ओलांडल्या गेली तर मात्र, आपण प्रश्नांच्या कात्रीतून सुटूच शकणार नाही, असे भाव ‘लोकमत’च्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा यांनी व्यक्त केले.
ज्येष्ठ स्वातंत्र्यसंग्राम सेनानी व लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा यांची जन्मशताब्दी तथा लोकमत नागपूरच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त "भारतीय माध्यमांचे पूर्णपणे ध्रुवीकरण झाले आहे का? या विषयावर रामदासपेठेतील हॉटेल सेंटर पॉइंटमध्ये दुपारी ३ वाजता 'लोकमत नॅशनल मीडिया कॉन्क्लेव्ह'चे आयोजन करण्यात आले, यात ते बोलत होते.
एखाद्या गंभीर विषयाला घेऊन मीडियाचं प्रस्तुतीकरण हे आता बदलत चाललं आहे. ती कितपत स्पष्ट व सत्ययापूर्ण असेल यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. पेपरचं कार्य फक्त सूचना देणेचं नव्हे तर त्या आपली भूमिका निष्पक्षपणे मांडणे ती विकसीत करणे आहे. यासह त्यातील मूळ भावनेला कुठेही धक्का न लागता ती वाचक, पाठकांपर्यंत पोहोचवणे होय. आपल्या कार्यासह ती निष्पक्षता टिकवून ठेवणं हे आजच्या काळाची गरज आहे, असं त्यांनी म्हटलं.
यावेळी वन सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार, लोकमत मीडिया ग्रुपचे समूह संपादक शरद बाविस्कर, एशियन न्यूज इंटरनॅशनल (एएनआय)च्या वृत्तसंपादक स्मिता प्रकाश, टाइम्स नेटवर्कच्या समूह संपादक नाविका कुमार, न्यूज 18 चे व्यवस्थापकीय संपादक अमित देवगण, एबीपीचे राष्ट्रीय संपादक विकास भदौरिया, न्यूज 18 लोकमतचे संपादक आशुतोष पाटील, पंजाब केसरी व नवोदया टाइम्सचे कार्यकारी संपादक अकु श्रीवास्तव, राहुल पांडे राज्य माहिती आयुक्त नागपूर व छत्रपती संभाजीनगर, एस एन विनोद ज्येष्ठ पत्रकार व लोकमत समाचारचे पहिले संपादक, प्रदीप मैत्र सहयोगी संपादक हिंदुस्थान टाइम्स, सरिता कौशिक उपकार्यकारी संपादक एबीपी माझा, संपादक लोकमत डिजिटल न्यूज आशिष जाधव, संजय शर्मा सहयोगी संपादक लोकमत समाचार आदी उपस्थित होते.