निशांत वानखेडेनागपूर : मार्च महिना सुरू झाला की हळूहळू आकाशात सूर्य तापायला लागतो. पुढे एप्रिल, मे महिन्यात अंगाची लाही लाही करणारे हे ऊन प्रत्येकाला नकोसे असते. मात्र हाच तप्त उन्हाळा वीटभट्टीसाठी सुगीचा असतो. कारण याच तापाने ओल्या विटा पक्क्या होऊन घर बांधणीस उपयुक्त होतात; मात्र यावर्षी असे नाही. सूर्य तापतो आहे पण वीटभट्ट्यांचे काम थंड पडले आहे. कोरोनाने सर्व हिरावले आहे आणि या परिस्थितीत वीटभट्ट्यांवर काम करणाऱ्या मजुरांच्या चुलीही थंड पडल्या आहेत.नागपूर जिल्ह्यातील कामठी तहसीलच्या केवठा गावात तलावाकाठी शेतात लागणाºया वीटभट्ट्यांची कामे थांबलेली आहेत. खोदून एका ठिकाणी जमा केलेले काळ्या रेतवट मातीचे ढिगारे व त्यात मिक्स करण्यासाठी खापरखेडा औष्णिक वीजकेंद्रावरून आणलेले राखेचे ढिगारे एका बाजूला नुसतेच पडून आहेत. अशा विदारक वातावरणात भट्ट्यांवर कामासाठी आलेले कामगार खिन्न मनाने बसले आहेत. जेमतेम विटा बनविण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. होळीला मजूर गावी गेले; मात्र परतल्यावर काम सुरळीत सुरू होण्यापूर्वी कोरोनाने थैमान घातले आणि टाळेबंदीत काम ठप्प झाले.दोन व्यक्ती दिवसाला १००० ते १५०० विटा बनवितात. हजार विटांचे ७०० रुपये मिळतात. त्यातून एका मजुराची ३५० ते ५०० रुपयांपर्यंत रोजी पडते. नागपूर आणि भंडारा जिल्ह्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात वीटनिर्मितीचे काम चालते. त्यामुळे आसपासच्या जिल्ह्यांसह मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, छत्तीसगडपासून मजूर कामाला येतात आणि भट्टीच्या आसपास झोपड्या करून राहतात; मात्र दोन महिन्यांपासून विटा बनविण्यापासून विक्रीला नेण्यापर्यंत सर्व प्रक्रिया बंद असल्याने सर्व मजूर डोक्यावर हात ठेवून बसले आहेत.केवठा भट्टीवरील मजूर राहील रामटेके याने सांगितले, होळीनंतर आम्ही इकडे आलो होतो. थोडे काम झाले आणि बंद पडले. काम बंद झाल्याने काही मजूर पायपीट करीत गावाकडे परतले. त्यांच्यासोबत आता १६ मजूर काम सुरू होण्याच्या आशेवर थांबले आहेत. मालकाने कुटुंबाला हजार - हजार रुपये दिले. एवढ्या पैशात काय होईल आणि काय घेऊन गावाकडे जाऊ, ही व्यथा त्यांनी व्यक्त केली. अशा वेगवेगळ्या ठिकाणी शेकडो मजूर थांबले आहेत. वीटभट्टी मालक मंगेश गोंडाने यांनीही हतबलता मांडली. अर्धवट माल पडला आहे, कामात पैसे थकले आहेत, मग मजुरांना काय देणार, हा प्रश्न असल्याचे ते म्हणाले.
खायला दाणा नाही आणि खिशात पैसे नाहीतविविध ठिकाणांवरून आलेल्या या मजुरांपुढे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. खायला दाणा नाही आणि खिशात पैसे नाहीत. आशा अवस्थेत दिवस काढत आहेत. त्यांची अवस्था बघायला गेलेल्या संघर्षवाहिनी आणि दुर्बल समाज विकास संस्थेच्या कार्यकर्त्यांनी या मजूर कुटुंबांना धान्य दिले. दीनानाथ वाघमारे, मुकुंद आदेवार, धीरज भिसीकर, सचिन लोणकर आदी कार्यकर्ते सातत्याने अशा निराधार लोकांच्या मदतीला धावत आहेत.