लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे व जनसंवाद अभ्यासमंडळाचे माजी अध्यक्ष सुनील मिश्रा यांच्यातील वादाच्या ठिणग्या आणखी तीव्र झाल्या आहेत. एकीकडे मिश्रा यांनी कुलगुरू व त्यांच्या मुलीच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली आहे, तर प्रशासनाने मिश्रा यांचे २३ वर्षे जुने प्रकरण परत चौकशीसाठी बाहेर काढले आहे. सुनील मिश्रा यांनी विद्यापीठाला परत केलेल्या ‘एलएलबी’च्या गुणपत्रिका ‘बोगस’ होत्या असा प्रशासनाला संशय असून त्याची चौकशी करण्यात येणार आहे. त्यांच्याविरोधात विद्यापीठ प्रशासनातर्फे पोलीस तक्रार करण्यात येणार आहे. एकूणच हा वाद विद्यापीठाचे राजकारण आणखी तापविणारा ठरणार आहे.मिश्रा यांनी १९९५ मध्ये ‘एलएलबी’ प्रथम वर्षची परीक्षा दिली होती. ‘लॉ आॅफ टार्ट’ या विषयाच्या पेपरचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी त्यांनी परीक्षा विभागात अर्ज केला होता. पुढे कोहचाडे प्रकरणात मिश्रा यांची चौकशी झाली. मिश्रा यांना बोगस गुणवाढ प्रकरणी २००७ साली १२ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष व तृतीय वर्षाची गुणपत्रिका विद्यापीठाला परत करत असल्याचा अर्ज तत्कालीन कुलगुरू डॉ. एस.एन.पठाण यांना केला होता. १३ नोव्हेंबर २००६ च्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत हे प्रकरण ठेवण्यात आले होते व परीक्षा मंडळाने या तिन्ही गुणपत्रिका परत घेण्याच्या व त्या रद्दबातल ठरवित असल्याचा निर्णय घेतला होता.मात्र या गुणपत्रिकाच ‘बोगस’ असल्याचा विद्यापीठ प्रशासनाला संशय आला. यासंदर्भात चाचपणी करण्यात आली होती व त्याचा अहवाल परीक्षा विभागाकडून मागविण्यात आला होता. या मुद्यावर परीक्षा मंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली.तत्कालीन परीक्षा मंडळाने मिश्रा यांच्या गुणपत्रिका रद्दाबातल करण्यास नियमबाह्य पद्धतीने मान्यता दिली होती. परीक्षा मंडळाला अशा पद्धतीने पदवी किंवा गुणपत्रिका मागे घेण्याचा किंवा रद्द करण्याचा कुठलाही अधिकार नाही. तसेच हे संपूर्ण प्रकरण न्यायालयीन असताना मिश्रा यांची गुणपत्रिका ही न्यायालयाच्या ताब्यात होती. असे असतानाही त्यांनी ही गुणपत्रिका विद्यापीठाकडे जमा कशी केली व त्यांच्याकडे बनावट गुणपत्रिका कुठुन आली, असा प्रश्न कुलगुरूंनी उपस्थित केला. यावर परीक्षा मंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत सखोल चर्चा झाली. कारवाईचे सर्वाधिकार कुलगुरुंना देण्यात आले आहेत.या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून सुनील मिश्रा आणि तत्कालीन परीक्षा मंडळ सदस्यांच्या विरोधात पोलीस तक्रार देणार असल्याचे डॉ. काणे यांनी सांगितले.मिश्रांमुळे मिश्रांचे प्रकरण आले बाहेरसुनील मिश्रा यांच्या गुणपत्रिकेचे प्रकरण हे डॉ.वेदप्रकाश मिश्रा यांच्या वाङमय चौर्यकर्म प्रकरणामुळे बाहेर आले, अशी माहिती कुलगुरूंनीच दिली. २६ फेब्रुवारी २०१८ रोजी आयोजित व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत डॉ.मिश्रा यांनी पदविका परत करण्यासंदर्भातील अर्ज मांडण्यात आला. या अर्जात अगोदर अशा पद्धतीने प्रदीप राठोड व सुनील मिश्रा यांच्या पदव्या परत घेण्यात आल्याचे नमूद होते. हीच बाब प्रशासनाने पकडली व त्यानंतर या मुद्यावर चौकशी बसविली आहे.